कोल्हापूर : हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींना मानधन अदा : चंद्रशेखर साखरे; धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 02:14 PM2018-12-13T14:14:41+5:302018-12-13T14:15:57+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंचे थकीत मानधन अदा करण्यास बुधवारपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंचे थकीत मानधन अदा करण्यास बुधवारपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन रखडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये राज्यभर ५ डिसेंबरला प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी हे मानधन यापूर्वीच अदा केले असल्याचे सांगितले; मात्र, कोषागार कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंना मानधन मिळाले नव्हते. हे थकीत मानधन अदा करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.
याबाबत जिल्हा क्रीडाधिकारी साखरे यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील १0 हिंदकेसरी, चार महाराष्ट्र केसरी आणि पाच वयोवृद्ध खेळाडूंच्या थकीत मानधनाची एकूण रक्कम ७ लाख ८ हजार रुपये कोषागार कार्यालयाकडून मंगळवारी क्रीडा कार्यालयाच्या खात्यावर जमा झाले; त्यामुळे संबंधित मल्ल, वयोवृद्ध खेळाडूंना त्यांच्या मानधनाच्या धनादेशांचे वितरण बुधवारपासून सुरू केले.
दिवसभरात दोन हिंदकेसरींना धनादेश देण्यात आले. उर्वरित हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, वयोवृद्ध खेळाडूंशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. धनादेश नेण्यासाठी येताना संबंधित मल्ल, खेळाडूंनी त्यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन येणे आवश्यक आहे.