कोल्हापूर : हॉटेलचे बिल मागितल्याच्या रागातून दोघांना भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:28 PM2018-07-20T18:28:22+5:302018-07-20T18:31:15+5:30
राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यास चाकूने भोसकले. अजित भूपाल कांबळे (वय २३), सुनील मिलिंद कांबळे (२२, दोघे रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत.
कोल्हापूर : राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यास चाकूने भोसकले. अजित भूपाल कांबळे (वय २३), सुनील मिलिंद कांबळे (२२, दोघे रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत.
या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सराईत गुंड गौरव भालकर (रा. २८, प्रतिभानगर), जया डंक, प्रशांत कांबळे (दोघे रा. शास्त्रीनगर), आकाश दाभाडे ऊर्फ मॅँव व त्याचे आणखी दोन साथीदार, आदींवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, अजित कांबळे व सुनील कांबळे हे राजारामपुरी दुसरी गल्ली येथील हॉटेल मॅजिस्ट्रीकमध्ये नोकरीला आहेत. अजित हा व्यवस्थापक, तर सुनील वेटर आहे. गुरुवारी रात्री गौरव भालकर हा साथीदारांसोबत हॉटेलमध्ये आला. दारू, जेवण घेतल्यानंतर त्याचे बिल २७५० रुपये झाले.
व्यवस्थापक अजित कांबळे याने बिलाची मागणी केली असता एवढे कसे बिल झाले म्हणून त्यांनी त्याच्याशी वादावादी केली. यावेळी ‘बिल देत नाही जा,’ असे म्हणून त्याच्या डोक्यात चाकूने हल्ला केला.
सुनील वादावादी सोडविण्यास गेला असता त्याने त्याच्या पोटात चाकूने वार केले. दोघांवर खुनी हल्ला झाल्याने गोंधळ उडाला व संशयित पसार झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत दोघांनाही सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
भालकरचा नाटकी स्वभाव
खुनाचा प्रयत्न, घरात घुसून मारहाण, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या संशयित गौरव भालकर याने ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’खाली (मोक्का) कारवाई टाळण्यासाठी राजारामपुरी पोलिसांच्या हातून निसटून फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
त्याच्यावर पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अटकेदरम्यान पोटदुखीचे निमित्त दाखवून तो रुग्णालयात दाखल होतो. तेथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा दादागिरी, दहशत माजवीत असतो. नाटकी स्वभावापुढे तो पोलिसांना चकवा देत असतो.