कोल्हापूर : ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर फुलले आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी झाली असून, हायवेपासून ते अगदी शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. अंबाबाई, जोतिबा या तीर्थक्षेत्रांसह शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, पन्हाळा, कणेरी, गगनबावडा, चांदोली अशी पर्यटनस्थळे पुन्हा एकदा बहरली आहेत.दरवर्षी उन्हाळा, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यंदा कोरोनाच्या धास्तीमुळे दिवाळीपर्यंत पर्यटकांनी कोल्हापुरात येणे टाळले. आता मात्र कोरोना संसर्ग थांबल्याने नागरिकदेखील पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत.
शुक्रवारी ख्रिसमसची सुटी, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्या आहेत. शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी ख्रिसमसमुळे ऑनलाईन वर्गांनादेखील सुटी देण्यात आल्याने या सगळ्यांमुळे गुुरुवारी सायंकाळपासूनच कोल्हापुरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.शुक्रवारी दुपारपासून मुंबई-पुण्यासह अन्य जिल्हयांतील वाहने कोल्हापुरात दाखल होऊ लागल्याने हायवेला तसेच कोल्हापूर प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात अंबाबाई मंदिराला जोडणारे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, दसरा चौक, सीपीआर, मिरजकर तिकटी, शनिवार पेठ, रंकाळा या ठिकाणी सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती.
दसरा चौकात वाहने लावण्यासाठी जागा नव्हती. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, धर्मशाळा, भक्तनिवास याठिकाणीही नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी होती.