कोल्हापूर : जनआंदोलने चिरडाल तर मंत्र्यांना फिरणे मुश्कील करू, युवक राष्ट्रवादीचा एल्गार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:10 PM2018-02-06T17:10:23+5:302018-02-06T17:16:41+5:30
भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.
कोल्हापूर : भाजप सत्तेच्या बळावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणत आहे. पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखे राबवून घेतले जात आहे. सत्तेच्या ताकदीवर जनसामान्यांची आंदोलने चिरडाल तर याद राखा. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांनी दिला.
राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मंगळवारी युवक राष्ट्रवादीचा कॉँग्रेसच्या वतीने ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. सासने मैदानातून युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. हलगीचा कडकडाट व सरकारविरोधातील घोषणा देत युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती. (छाया - आदित्य वेल्हाळ)
येथे झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी भाजप सरकारची अक्षरश: चिरफाड केली. कोते-पाटील म्हणाले, या राज्यात विद्यार्थी, तरुण अस्वस्थ आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समाजातील एकही घटक सुखी नसल्याने सगळीकडे असंतोष पसरला आहे. अशा परिस्थितीत सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणले जाते.
आंदोलन मोडून काढून दहशत पसरविली जात असून, याचा निषेध करण्यासाठी राज्यातील दोन लाख तरुण ‘एल्गार मोर्चा’च्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांतील एक लाख तरुणांना घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळावर धडक देणार असल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले.
प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे गाजर दाखविले. जी. एस. टी., नोटाबंदीमुळे उद्योग बंद पडल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. कौशल्य विकास योजनेंतर्गत ७२५२ प्रशिक्षण संस्था पैशांअभावी बंद पडल्या आहेत. डी. एड., बी. एड्.ची पदवी घेतलेले लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत.
आदिल फरास, युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, रणजितसिंह पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, संगीता खाडे, कल्पेश चौगुले, अमोल माने, विकास पाटील, राजवर्धन नाईक, नितीन जांभळे, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते.
नविद मुश्रीफ यांचे कौतुक!
नविद मुश्रीफ यांनी एल्गार मोर्चाचे अवघ्या चार दिवसांत यशस्वी नियोजन केले. मोर्चात तरुणांची लक्षणीय संख्या पाहून कोते-पाटील भारावून गेले आणि त्यांनी मुश्रीफ यांचे कौतुक केले.
गाजरांची माळ अन् लक्षवेधी फलक
मोर्चात कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माजी नगरसेवक अमोल माने यांनी गळ्यात चक्क गाजरांची माळ घालून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
मोदींच्या चेहऱ्यांशी साम्य असलेली व्यक्ती मोर्चात आणली होती. त्यांच्या हातात गाजर व गळ्यात ‘मी भारताला लागलेले ग्रहण; लवकरच सुटेन’ असा अडकविलेला फलक लक्षवेधी होता.