Kolhapur- सीमा तपासणी नाका सुरू करण्यास कागलच्या शेतकऱ्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:05 PM2023-03-31T18:05:42+5:302023-03-31T18:05:49+5:30
नाक्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध कारणांवरून हा नाका सुरू करू देण्यास विरोध केला
कागल : येथील सीमा तपासणी नाका अदानी समूहाने चालविण्यास घेतला असून १ एप्रिल २०२३ पासून हा नाका सुरू करण्याची जोरदार तयारी कंपनीने सुरू केली आहे. मात्र, या नाक्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध कारणांवरून हा नाका सुरू करू देण्यास विरोध केला आहे. १ मार्च रोजी येथे आंदोलन झाले होते. खासगी सुरक्षा रक्षकांना पिटाळून लावले होते. आता पुन्हा हा विरोध सुरू आहे.
कंपनीने जमिनी घेताना येथे नोकरीसाठी भुमिपुत्रांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळलेले नाही, असा या शेतकऱ्यांचा मुख्य आरोप आहे. आज एका शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यात निवेदन दिले तसेच कंपनीचे अधिकारी सुनील पोवार यांना भेटून त्यांना धारेवर धरले. या वेळी संजय गोनुगडे, योगेश गाताडे, प्रशांत घाटगे, महेश घाटगे, तौसिफ मुल्ला, सतीश पोवार, सुहास हिंगे, गजानन घाटगे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांकडून जमिनी घेताना विविध आश्वासने दिली होती. शेतीकडे जाण्याचा रस्ता बनविला नाही. नाका बांधकामामुळे भर पडून उर्वरित शेती पाण्याखाली जात आहे. त्यावर उपाययोजना केलेली नाही. पर्यायी रस्ते नाहीत. शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळाल्याने आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. असे असताना हा नाका बळजबरीने सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.