कोल्हापूर : ‘क्रिडाई कोल्हापूर’चे ‘गृहदालन २०१८’ हे प्रॉपर्टीविषयक प्रदर्शनाचा शुक्रवारी (दि.२६) प्रारंभ होणार आहे. शाहूपुरी जिमखाना मैदानावर हे प्रदर्शन सोमवार (दि. २९) पर्यंत चालणार आहे. त्यात क्रिडाई कोल्हापूर आणि पुणे येथील सभासद सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव आणि गृहदालनचे समन्वयक विजय माणगांवकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष यादव म्हणाले, ग्राहकांना ‘एकाच छताखाली’ नवनवीन बांधकाम प्रकल्प पहावयास मिळावेत. त्याची माहिती घेता यावी या उद्देशाने या ‘गृहदालन’चे आयोजन केले आहे. रेरा, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्यांदाच हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
यामध्ये क्रिडाई कोल्हापूर, पुण्याचे सभासद, अर्थपुरवठादार, बांधकाम साहित्याचे विक्रेते, कंपन्यांचे स्टॉल्स् असणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२६) दुपारी पावणेतीन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘क्रिडाई महाराष्ट्रा’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया प्रमुख उपस्थित असतील.
शनिवारी (दि. २८) दुपारी चार वाजता अल्टाट्रेक सिमेंट लिमिटेडच्या तांत्रिक सेवेचे विभागीय प्रमुख देवेंद्रकुमार पांडे हे मार्गदर्शन करतील. सोमवारी (दि. २९) सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होईल.समन्वयक माणगांवकर म्हणाले, गृहदालन हे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगांव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबईतील ग्राहक, व्यावसायिकांना पर्वणी ठरणारे आहे. या प्रदर्शनात लकी ड्रॉ आयोजित केला आहे. याअंतर्गत प्रदर्शनकाळात नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना अॅक्टिवा दुचाकी, ४० इंची एलईडी टीव्ही, मायक्रो ओव्हन जिंकण्याची संधी आहे.
या पत्रकार परिषदेस ‘गृहदालन’चे अध्यक्ष प्रदीप भारमल, उपाध्यक्ष निखिल शहा, खजानिस विश्वजित जाधव, सह. समन्वयक महेश पोवार, गणेश सावंत, संदीप पोवार, गौतम परमार, बिलाल तहसीलदार, सत्यजित मोहिते, संग्राम दळवी, सुनील बकरे उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण गृहदालनया प्रदर्शनमध्ये ‘क्रिडाई’चे सभासद, हौसिंग फायनान्स संस्था, बांधकाम साहित्याचे विक्रेते, प्रायोजकांचे एकूण ९३ स्टॉल असणार आहेत. गृहकर्ज, नवीन योजना, बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. गृहदालन हे वैशिष्ट्यपूर्ण असेल. कोल्हापूरची निर्माण होत असलेल्या नव्या ओळखीच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणारे आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे अध्यक्ष प्रदीप भारमल यांनी दिली.