- संदीप आडनाईक कोल्हापूर - येथील चित्रकार नागेश हंकारे यांच्या जलरंगातील ब्युटी ऑफ नेचर इन हिमालया या चित्रास सर्बियाच्या इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी (आयडब्ल्यूएस)चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील अनेक देशातून आलेल्या चित्रातून त्यांच्या चित्रांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आयडब्ल्यूएस ही २०१२ मध्ये स्थापन झालेल्या जलरंगात काम करणाऱ्या चित्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देणारी जागतिक संस्था आहे. चित्रकार नागेश हंकारे यांच्या जलरंगातील ब्युटी ऑफ नेचर इन हिमालया या चित्राची या संस्थेने पुरस्कारासाठी निवड केली आहे. याशिवाय त्यांच्या पाच चित्रांची निवडही इंटरनॅशनल वॉटर सोसायटीने पाच देशात आयोजित केलेल्या वॉटर कलर पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी झाली आहे. पोलंड, तुर्की, सेरेबिया, नेपाळ, इराण, इक्विडोर या देशातील आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने होणार आहेत.
नागेश हंकारे हे शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील असून, गेली ३० वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. कोरगावकर हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असणाऱ्या हंकारे यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे. 'ब्रँड कोल्हापूर' या पुरस्काराने त्यांना अलीकडेच सन्मानित केले आहे. हिमाचल प्रदेशाच्या गव्हर्नमेंट म्युझियम ऑफ शिमला येथील चित्रप्रदर्शनासाठी त्यांच्या दोन चित्रांची निवड झाली असून, ते प्रदर्शन शिमला म्युझियम येथे एक महिना सुरू राहणार आहे. राज्य सरकारच्या मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात येणाऱ्या राज्य कला चित्रप्रदर्शनासाठीही त्यांच्या ब्युटी ऑफ नेचर वन आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित चित्रप्रदर्शनासाठी ब्युटी ऑफ नेचर टू या ॲक्रेलिक माध्यमातील चित्राची निवड झाली आहे.