कोल्हापूर : धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत समाज रस्त्यावर, मोर्चाला ७७ समाज संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 05:25 PM2018-01-28T17:25:41+5:302018-01-28T18:21:03+5:30
‘होय आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरीता तन-मन-धन लावून लढेन, एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन’ अशा एकसुरात तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या मागणीकरीता समस्त लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला.
कोल्हापूर : ‘होय आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरीता तन-मन-धन लावून लढेन, एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन’ अशा एकसुरात तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या मागणीकरीता समस्त लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला.
मोर्चामुळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर हातात भगवे ध्वज, डोकीवर पांढरी टोपी आणि गळ्यात स्कार्प घातलेला जनसागर अवतरला. या अभुतपूर्व मोर्चाने दीड वर्षापूर्वी निघालेल्या मराठा मोर्चाच्या आठवणींना उजाळा मिळाला. लिंगायत समाजाने एकीचे दर्शन मोर्चाद्वारे घडविले.
अखिल भारतीय लिंगायत समाज समिती (कोल्हापूर)ने लिंगायत धर्म राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चाला ७७ समाज संघटनांनी पाठींबा दिला होता तर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या व्यासपीठावर हजेरी लावून स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे पंजाबातील अमृतसर येथील शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजित सिंह मान यांच्यासह जसकरण सिंग, महेंद्रपाल सिंग, अमृतसिंग, हरपाजन सिंग काश्मिरी, रणजितसिंग सिंगेडा, कुलदीप सिंग पागोवाळ,कर्मसिंग मोईया, परगट सिंग मखू, रमिंदर सिंग जुवेसे, नवदीप सिंग, प्रतपाल सिंग, लालन मोहन आदी सरदारांनी मोर्चात सहभागी होऊन लक्ष वेधून घेतले.
येथील ऐतिहासिक दसरा चौक येथून दुपारी दीड वाजता महामोर्चाला सुरवात झाली. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजल्यापासून समाजातील लोक दसरा चौकाकडे जात होते. काही समाज बांधव शंभर, दोनशे, पाचशेच्या संख्येने एकत्रीतपणे दसरा चौकाकडे जात होते.हलगी, घुमके,चाळीच्या गजराने मोर्चेकरांचा उत्साह वाढविला.
दुपारी बारा वाजता दसरा चौक जनसागराच्या गर्दीने न्हाऊन गेला. नंतर हीच गर्दी पूर्वेकडे व्हिनस कॉर्नर, स्टेशनरोडपर्यंत , दक्षिणेकडे स्वयंभू गणेश मंदिरपर्यंत तर उत्तरेकडे शहाजी महाविद्यालयापर्यंत वाढत गेली. त्यानंतर मात्र अनेकांना दसरा चौकाच्या दिशेने येणेही अशक्य झाले. मोर्चात समाजबांधव नातेवाईकांसह सहकुटुंब, सहपरिवार सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्तीच्या डोकीवर बसवेश्वरांची प्रतिमा असलेली पांढरीटोपी, गळ्यात भगवा स्कार्प आणि हातात भगवा ध्वज दिसत होता.
लिंगायतांच्या मोर्चाला ७७ समाजांनी तसेच संघटनांनी पाठींबा दिला असला तरी व्यासपीठावर मात्र केवळ प्रातिनिधीक वक्तयांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार संध्यादेवी कुपेकर,आमदार सुजित मिणचेकर, आमदार सतेज पाटील, अकाली दलाचे सिमरनजीससिंह माण, माजी आमदार संजयसिंह घाटगे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आदींनी त्यांच्या भाषणात लिंगायत समाजाच्या न्याय मागण्यांना पाठींबा दिला.
शाहू छत्रपती, कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांनीही काही वेळ मोर्चात सहभागी होऊन आपला पाठींबा दिला. दुपारी दीड वाजता सभेची सांगता होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला.
मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत
शहराच्या विविध भागातून समाजबांधव जोशपूर्ण घोषणा देत दसरा चौकाकडे जात होते. ‘भारत देशा जय बसवेशा, लिंगायतांची हाक सर्वांची साथ, मी लिंगायत माझा धर्म लिंगायत, लिंगायत समाजाला संवैधानिक मान्यता मिळालीच पाहिजे, लिंगायत धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळालाच पाहिजे, जगत्जोती महात्मा बसवेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा मोर्चात दिल्या जात होता. घोषणांचा हा गजर मोर्चा संपेपर्यंत अखंडपणे सुरु होता.
शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लजचा मोठा सहभाग
कोल्हापूर जिल्ह्यातून समाजबांधव मोर्चाकरीता आले होते. शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज येथून मोर्चाला आलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. याशिवाय शेजारच्या कर्नाटक तसेच सांगली, सातारा जिल्ह्यातूनही लोक आले होते. परगांवाहून वेगवेगळ्या वाहनातून लोक आले होते. प्रत्येक तालुका, प्रत्येक गांवातील लोक गटागटाने मोर्चाकरीता आले होते.
पालकमंत्र्यांनी स्वीकारले निवेदन
जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील हे सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दसरा चौकात लिंगायत समाचाने उभारलेल्या व्यासपीठाजवळ येऊन समाजाचे निवेदन स्वीकारले. पालकमंत्र्यांसमवेत आमदार अमल महाडिकही होते. पालकमंत्र्यांना मोर्चाच्या समन्वयक सरलाताई पाटील यांनी निवेदन देऊन मागण्यांचा उहापोह केला.
यावेळी बाबुराव तारळे, राजशेखर तंबाखे, अनिल सोलापूरे, सुधीर पांगे, काकासाहेब कोयते, अमित झगडे, शिरीष साबणे, राजेश गाताडे, वैभव सावर्डेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, धनगर समाजाचे बबनराब रानगे उपस्थित होते.
लिंगायत समाजाच्या राज्यपातळीवरील मोर्चाची राज्य सरकार दखल घेतली असून तुमच्या मागण्यांची सोडवणुक करण्याकरीता योग्य निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली.
पाठींबा नव्हे, निवेदन स्वीकारायला आलोय
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा ताफा दसरा चौकात येताच संयोजकांचा घोषणा देण्यातील जोश अधिकच वाढला. संयोजकांपैकी एका निवेदकाने ‘जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील आपल्या समाजाच्या न्याय मागण्यांना पाठींबा देण्यासाठी आले आहेत’, असे एकदा सोडून दोन तीन वेळा माईकवरुन जाहीर केले.
पालकमंत्र्यांचे या निवेदनाकडे लक्ष जाताच त्यांनी निवेदन करणाऱ्यांला थांबवून ‘ मी इथे पाठींबा द्यायला आलेलो नाही, तुमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारायला आलोय’ असे स्पष्ट केले. तेंव्हा निवेदकाने त्याची चुक सुधारली.