Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती विरुद्ध भाजपचे संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. शाहू महाराज छत्रपती थेट राजकारणात उतल्याने आता त्यांना टीकांना सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी संजय मंडलिक यांनी तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या, असा थेट सवाल शाहू महाराजांना विचारला होता.
एकीकडे संजय मंडलिक यांनी आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, अशी टीका केलेली असताना या वादात आता थेट शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी उडी घेतली आहे. शनिवारी संजय मंडिलक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी राजवर्धनसिंह कदमबांडे हे थेट विमानाने धुळ्याहून कोल्हापुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी आताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.
संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी थेट या घराण्यातील वारस हक्कावर दावा सांगणारे राजवर्धनसिंह कदमबांडे यांना खास विमानाने कोल्हापुरात आणलं. यावेळी कदमबांडे हे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत देखील सहभागी झाले होते. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे.
काय म्हणाले राजवर्धनसिंह कदमबांडे?
"मी शाहू महाराजांचा रक्ता मासाचा वारसदार आहे. कोल्हापुरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते. त्यामध्ये ज्यांना कोल्हापूरमध्ये दत्तक घेण्यासाठी जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही. ते स्वतःहून गादीचे वारसदार म्हणवतात. पण जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहेत. मी काही संपत्तीचा वारसदार नाही तर शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे," असे राजवर्धनसिंह कदमबांडे म्हणाले.
काय म्हणाले होते संजय मंडलिक?
"आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला," असं संजय मंडलिक म्हणाले होते.
कोण आहेत राजवर्धनसिंह कदमबांडे ?
राजवर्धनसिंह कदमबांडे हे धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. कदमबांडे यांनी १९८४ साली इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. कदमबांडे हे राजर्षी शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या सुकन्या पद्माराजे तथा बेबीराजे सुपुत्र आहेत. कोल्हापूरच्या राजकन्येचा सुपुत्र म्हणून राजवर्धनसिंह कदमबांडे यांची ओळख आहे.