कोल्हापूर : महानगरपालिका बैठकीत कर्मचारी-नगरसेवक वाद टाळण्याकरिता समिती, आचारसंहिता करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:58 PM2018-03-15T12:58:10+5:302018-03-15T12:58:10+5:30
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांदरम्यान विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्याकरिता संयुक्त समिती नेमण्याचा, तसेच त्यासंबंधी एक आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांदरम्यान विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्याकरिता संयुक्त समिती नेमण्याचा, तसेच त्यासंबंधी एक आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांना झालेली शिवीगाळ व धमकीप्रकरणी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कर्मचारी संघाने आपले ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले.
शहरातील अतिक्रमण काढत असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली होती.
त्यामुळे पंडित पोवार यांच्यासह महापालिका कर्मचारी संघाने महापौर यवलुजे व आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन दिले होते. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार महापौर यवलुजे यांनी मनपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
कर्मचारी संघाच्यावतीने कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे, तसेच धमकावण्याचे प्रकार यापूर्वी अनेकवेळा घडलेले आहेत. म्हणूनच पंडित पोवार यांना झालेल्या शिवीगाळप्रकरणी ठोस कारवाई झाली पाहिजे. अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे, वाद टाळण्याकरिता समिती स्थापन करून आचारसंहिताही तयार करावी, अशा सूचना केल्या.
इंद्रजित बोंद्रे यांनी कोणा कर्मचाऱ्यांना शिवागाळ केली नसल्याचा खुलासा कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला. तरीही कोणाचा अवमान झाला असल्यास त्याबद्दल आघाडी प्रमुख म्हणून मी व्यक्तीश: दिलगिरी व्यक्त करतो, असेही देशमुख यांनी सांगितले. याव्यतिरिक्त कर्मचारी संघाच्या सर्व सूचना त्यांनी मान्य केल्या. अतिक्रमण विभागाकडे सक्षम अधिकारी नेमण्याबाबत आयुक्तांना सांगण्यात येईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमण काढण्यासाठी जात असताना कोणत्या दिवशी कोणत्या भागात जाणार आहे याची माहिती आधी संबंधितांना द्यावी, अशी नगरसेवकांनी अपेक्षा व्यक्त केली. राहुल चव्हाण, अर्जुन माने, संजय मोहिते यांनी वारंवार सांगूनसुद्धा काही भागातील अतिक्रमण हटविले जात नाही. शहरातील सर्वच खाऊ गल्ल्यातून अतिक्रमण वाढले आहे. मात्र, तिकडे कानाडोळा केला जातो, असा दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षाही नगरसेवकांनी व्यक्त केली.
बैठकीस उपमहापौर सुनील पाटील, सभागृह नेते प्रवीण केसरकर, शिक्षण सभापती वनिता देठे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक राहुल माने, संजय मोहिते, तर कर्मचारी संघाचे काका चरापले, दिनकर आवळे, रमेश पोवार, अजित तिवले, अनिल साळोखे, सिकंदर सोनुले, धनाजी खिलारे, लक्ष्मण दाभाडे, बाळू चौगुले उपस्थित होते.
दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे
कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी जर का कोणा कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व, अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कर्मचारी संघाने ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले आहे. आम्ही केलेल्या मागण्या महापौरांसह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत.
त्यामुळे आंदोलन करण्यात आता अर्थ नाही, असा खुलासा संघाचे कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे यांनी केला. मात्र, पंडित पोवार यांनी जर पोलिसांत जाऊन इंद्रजित बोंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर पोवार यांच्या पाठीशी राहू, असेही वणकुद्रे यांनी स्पष्ट केले.
नैतिक मूल्ये जपली : इंद्रजित बोंद्रे
सार्वजनिक कार्यात सहभागी होत असताना नैतिक मूल्यांचे पालन करण्याची जबाबदारी मी नेहमी कर्तव्य भावनेने स्वीकारली आहे. पंडित पोवार शिवाजी पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे. तथापि, चार दिवसांपूर्वी माझ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनसामुग्री संदर्भात नुकसान होऊ नये म्हणून मी काही अधिकाऱ्यांना विनंती केली होती. दुर्दैवाने याचा विपर्यास झाला. ही बाब जर गुन्हा वाटत असेल तर संबंधितांनी माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करावा, असे इंद्रजित बोंद्रे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.