कोल्हापूर : सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत यापूर्वीच ठरल्याप्रमाणे उद्या, २ आॅक्टोबरला गांधी जयंती दिवशी फुलेवाडी, शिये, शिरोली व शाहू या टोलनाक्यांवर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे करणार आहेत. नाक्यांच्या दोन्ही बाजूला २०० मीटर अंतरावर थांबून कार्यकर्ते वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती करणार आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी आज, बुधवारी कृती समितीची बैठक झाली. शहरवासीयांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. बैठकीसाठी निवास साळोखे, दिलीप पवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, चंद्रकांत यादव, बाबा पार्टे, महेश जाधव, अशोक पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिये, शाहू, फुलेवाडी व शिरोली या टोलनाक्यांच्या दोन्ही बाजूला कार्यकर्ते वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती करणार आहेत. ‘मी टोल देणार नाही - नाही म्हणजे नाही’, ‘आम्ही कोल्हापुरी लय भारी’ अशा आशयाची पत्रके वाहनधारकांना वाटण्यात येणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत चालणारे हे ठिय्या आंदोलन अत्यंत शांततेत पार पाडण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. (प्रतिनिधी)
कोल्हापूर : आज कृती समितीचे टोलनाक्यांवर आंदोलन
By admin | Published: October 01, 2014 10:51 PM