कोल्हापूर : मिळकत कर हा चुकीचे सूत्र लागू करुन महानगरपालिका घेत आहे. संंबंधित सूत्र बदलून कोल्हापुरातील मिळकतधारकांना दिलासा द्यावा. या कराच्या आकारणीबाबतचा सविस्तर अभ्यास करुन क्रिडाई कोल्हापूरने अहवाल तयार केला आहे.
हा अहवाल प्रशासन, महापालिका आयुक्त, अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना देणार आहे. या कर आकारणीच्या अनुषंगाने त्यांनी गांभीर्याने विचार करावा, असे क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव यांनी सोमवारी येथे सांगितले.अध्यक्ष यादव म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात भाडेकरु असलेल्या वाणिज्य वापराच्या इमारतीबाबत मिळकत कराचे प्रमाण ७५ ते ८० टक्के येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्यास धजत नाहीत. यातून साहजिकच शहराची वाढ, रोजगार निर्मितीवर परिणाम होत असून शहराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
त्यासंबंधाने क्रिडाई कोल्हापूरने सविस्तर, सखोल अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे. संबंधित अहवाल हा क्रिडाई कोल्हापूरने स्थापन केलेल्या कर आकारणी अभ्यास गट समितीने केला आहे. त्यासाठी दोन महिने लागले.
या समितीमध्ये प्रकाश देवलापूरकर (समितीचे अध्यक्ष), मोहन यादव (सल्लागार), अजय कोराणे, प्रसाद भिडे, विलास रेडेकर, शंकर गावडे, आण्णासाहेब अथणे, शाम नोतानी, राहूल देसाई, मुकेश चुटाणी, प्रणय मुळे यांचा समावेश आहे.
सातपट कर आकारणीकुळ वापरातील अनिवासी मिळकतींचे कोल्हापूर महापालिकेतर्फे आकारण्यात येणाºया कराविषयी माहिती जमा केली. यातून कोल्हापूर शहरामध्ये राज्यातील इतर ‘ड’ वर्ग महापालिकेच्या तुलनेत सातपट कर आकारणी होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती कर आकारणी अभ्यास गट समितीचे अध्यक्ष प्रकाश देवलापूरकर यांनी दिली.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र महापालिका अधिनियम २०१२ यांचा सखोल अभ्यास केला. कुळ वापरातील मिळकतीचे भांडवली मूल्य आधारित कोल्हापूर महापालिका विनियमाद्वारे लागू केलेले सूत्र चुकीचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वसूल केला जात हा जाचक कर थांबविण्यात यावा.
या कर आकारणीच्या सूत्रामध्ये बदल करुन योग्य ती कर आकारणी करावी. त्याद्वारे मिळकत धारकांना दिलासा द्यावा, अशी माहिती देवलापूरकर यांनी केली आहे.
शहरातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- एकूण मालमत्ता मिळकतींची संख्या : १४५६१३
- करपात्र निवासी इमारती :११६३२३
- करपात्र अनिवासी इमारती : २९२९०