कोल्हापूर : नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची अनास्था, अधिकाऱ्यांची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांच्या दांड्या अशा वातावरणात शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेचा ४५ व्या वर्धापनदिनाचा समारंभ केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आला. कोणत्याही खास समारंभाचे नियोजन नाही की समाजातील चार प्रतिष्ठितांना निमंत्रण नाही.
नगरसेवकांना कसले स्वारस्य नाही की अधिकाऱ्यांना कसली आस्था. केवळ ध्वजारोहण आणि वीरपत्नी, वीरमाता-वीरपिता यांचे सत्कार करून पाऊण तासात समारंभ आटोपता घेण्यात आला आणि दिवसभराची सुटी मिळाल्याने सर्वांनी धूम ठोकली.कोल्हापूर महानगरपालिकेचा शुक्रवारी ४५ वा वर्धापनदिन झाला. वास्तविक एखाद्या संस्थेचा जेव्हा वर्धापनदिन असतो तेव्हा विशेष समारंभाचे आयोजन केले जाते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत आणि कर्मचाऱ्यांत मोठा उत्साह असतो. सहकारातील एखादी संस्था असले तर बरीच उधळपट्टी करून समारंभ साजरा केला जातो.
व्यावसायिक संस्था असेल तर त्याठिकाणी ग्राहक, प्रतिष्ठीत नागरिकांना बोलावून समारंभाचे आयोजन केले जाते. कोल्हापूर महानगरपालिका तर शहराची प्रातिनिधीक संस्था असल्याने त्यांचा वर्धापनदिन कसा धूमधडाक्यात साजरा व्हायला पाहिजे होता; परंतु तसे काहीही न होता केवळ पाऊणतासात पारंपरिक पद्धतीने समारंभ उरकून टाकण्यात आला.सध्या महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर ही दोन महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा शाल, साडी चोळी, वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारी पुस्तिका भेट देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभास सभागृह नेता प्रवीण केसरकर, परिवहन सभापती नियाज खान, शिक्षण सभापती वनिता देठे, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह तीन प्रभाग समिती सभापतींनीही दांडी मारली. काही अधिकारीही गैरहजर होते. एवढेच काय तर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या प्रभागातील नगरसेवकसुद्धा या समारंभाकडे फिरकले नाहीत.वर्धापनदिनाचे औचित्य साधून सर्व नगरसेवकांना रितसर निमंत्रण पाठविण्यात आले होते. अधिकाऱ्यांनाही परिपत्रकाद्वारे समारंभास उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तरीही ही अनास्था दिसून आली. केवळ औपचारिकता म्हणूनच कार्यभाग उरकण्यात आला. त्यात कोणताही उत्साह नाही की संस्थेबद्दल आस्था, जिव्हाळा दिसून आला नाही.महिला व बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, गटनेता सत्यजित कदम, विजय सूर्यवंंशी, नगरसेवक अशोक जाधव, सुभाष बुचडे, अफजल पिरजादे, शेखर कुसाळे, सुनील पाटील, कमलाकर भोपळे, अजित ठाणेकर, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, रूपाराणी निकम, सुनंदा मोहिते, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एस. के. माने, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, परवाना अधीक्षक सचिन जाधव, फंड अधीक्षक उमाकांत कांबळे, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, व्यायामशाळा प्रशिक्षक उपस्थित होते.