कोल्हापूर : अकृषक, रूपांतरित कर रद्द करा : ‘चेंबर आॅफ कॉमर्स’चे रॅलीद्वारे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:00 AM2018-03-17T11:00:35+5:302018-03-17T11:00:35+5:30
कोल्हापूर शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोल्हापूर : शहरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांना अकृषक व रूपांतरित कर वसुलीसाठी व दंड आकारणीसाठी पुन्हा एकदा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्या कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोध असून हे कर रद्द करावेत, अशी मागणी शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी चौकात सकाळी दहाच्या सुमारास सर्व व्यापारी व उद्योजक जमले. या ठिकाणी अकृषक व रूपांतरित करासंदर्भात पाठविलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली. यानंतर अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, उद्योजकांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
शिवाजी चौकातून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आली. या ठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अकृषक व रूपांतरित कराची आकारणी ही अन्यायी आहे. ज्यावेळी महापालिकेचे क्षेत्र निश्चित करण्यात आले, त्यावेळीच हे संपूर्ण क्षेत्र अकृषक किंवा बिगरशेती वापरासाठी आहे, असे घोषित करण्यात आले आहे. ते पुन्हा अकृषक करून घेण्याची काही गरज नव्हती.
महापालिका क्षेत्रात महसूल खात्याने कर आकारणी करणे गैर आहे. या क्षेत्रात जी काही कर आकारणी व्हायची, ती सर्व महापालिका या एकाच यंत्रणेने बसविली आहे. या क्षेत्रातील सर्व जमिनींच्या नोंदी शेती क्षेत्रासाठीची ७ बाय १२ ची पद्धत बदलून सिटी सर्व्हे नंबरप्रमाणे करण्यात आल्या. त्यावेळीही ते क्षेत्र हे बिगरशेती ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा ते बिगरशेती करण्याची सक्ती करणे व त्यावर आकारणी करणे गैर व अन्यायी आहे.
यावेळी शिवाजीराव पोवार, हरिभाई पटेल, आनंद माने, प्रदीप कापडिया, प्रवीण शहा, संपत पाटील, कुलदीप गायकवाड, संदीप नष्टे, वैभव सावर्डेकर, नयन प्रसादे, संभाजीराव पोवार, लक्ष्मण पटेल, सनतकुमार कोरडे, अरुण हत्ती, आदी उपस्थित होेते.