कोल्हापूर : माझ्या आजोळच्या लोकांनी मी टाकलेला ‘शब्द’ खरा करून दाखविला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांनी या विजयाबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले. चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार हे सा. रे. पाटील स्मृती पुरस्काराच्यानिमित्ताने कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर हे माझे आजोळ असून या शहरातील जनता ही जातीयवादी विचारांना कधीच थारा देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसारच या निवडणुकीचा निकाल लागल्याने पवार यांनी आमदार जाधव यांच्यासह त्यांच्या विजयासाठी राबलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे तोंड भरून कौतुक केले. या विजयाचा पवार यांना मनस्वी आनंद झाल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘कोल्हापूर उत्तर’च्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा. महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे. या मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार जाधव यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचे अभिनंदन केले. तुम्ही सर्वांनी एकजुटीने लढत दिल्यामुळेच हे मोठे यश मिळाल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. या भेटीवेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मालोजीराजे यांसह मान्यवर उपस्थित होते.