कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमधून भाजपकडून निवडणूक लढवावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी मला ऑफर दिली होती, परंतु मी सच्चा शिवसैनिक असल्यामुळे आणि मी काहीच नव्हतो, तेव्हापासून पक्षाने मला भरपूर दिल्यामुळे ती ऑफर नाकारली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असा गौप्यस्फोट राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी येथे केला.क्षीरसागर यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, दक्षिण महाराष्ट्र जाहिरात विभागप्रमुख अलोक श्रीवास्तव, उपवृत्त संपादक विश्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.क्षीरसागर म्हणाले, पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी जोडलेली नाळ, पक्षनेतृत्वाबद्दलची निष्ठा आणि प्रसंगी करावा लागलेला त्याग याची दखल म्हणून पक्षाने गत निवडणुकीत हरल्यानंतरही मोठे मानाचे पद दिले. भाजप-शिवसेना युती असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासह शिवसेनेच्या जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. कारण त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्याकरिता भाजप आमदारांची संख्या वाढवायची होती, असा आरोपही क्षीरसागर यांनी केला.
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सकारात्मक कामकाज करीत आहे. मंडळामार्फत विकासकामांकरिता अकरा हजार कोटींचा निधी वितरित केला जातो. राज्यभरातील सहा विभागात जाऊन त्या विभागांच्या एकत्रित बैठका घेऊन सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्याचा तसेच चांगल्या कामांना निधी देण्याचा प्रयत्न केला, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
पक्षाचा आदेशकोल्हापूर उत्तरची निवडणूक लढविण्याचा माझा तसेच शिवसैनिकांचा आग्रह होता. परंतु पक्षाने मला थांबण्याचा आदेश दिला. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे त्याग केल्यानंतरही पक्षावरील निष्ठा किती अढळ असते हे जाधव यांच्या विजयाच्या माध्यमातून दाखवून दिले, असे क्षीरसागर यांनी सांगितले.