कोल्हापूर : नागरिकांना आपली संपत्ती, मिळकत जाहीर करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ही संख्या दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात देशात १० लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला. कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरावा, असे आवाहन पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी सोमवारी येथे केले.
येथील आयकर विभाग आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आॅफ द इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित करदाते, सल्लागार यांच्याशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यू शाहुुपुरीतील ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट’च्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन म्हणाले, यावर्षी ११ लाख ५० हजार कोटी रुपयांपर्यंत कर जमा करण्याचे ध्येय आहे. नोटाबंदीच्या कालावधीत ज्यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली आहे. त्यांच्याबाबतची सर्व माहिती एकत्रित झाली आहे. त्यातील एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरणाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस गेली आहे.
या नोटिसीला ज्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यांना दुसरी आॅनलाईन नोटीस पाठविली आहे. अतिरिक्त रकमेचे विवरण ज्यांना देता येणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी यांचे कर भरण्याचे प्रमाण चांगले आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यापारी, उद्योजकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाचे कोल्हापूर अध्यक्ष डॉ. नवीन महाजन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘गोशिमा’चे लक्ष्मीदास पटेल, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, आदींसह चार्टर्ड अकौंटंट, करसल्लागार, उपस्थित होते. आयकर विभागाचे प्रधान आयुक्त एम. एल. कर्माकर यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर विभागाचे आयुक्त (अपील्स-२) एस. बी. मोरे यांनी आभार मानले.
एका ‘क्लिक’वर करदात्याची माहितीआयकर विभागाच्या कामकाजामध्ये संगणकीकरण वाढत आहे. त्यामुळे एकीकडे विवरणपत्र भरणे, रिफंड मिळविणे करदात्यांसाठी सोपे झाले आहे. दुसरीकडे प्रत्येक करदात्याची संपूर्ण माहिती, त्यांचा उद्योग, व्यवसायाचे स्वरूप, त्यांची गुंतवणूक, बँकेतील व्यवहार, आदी स्वरूपातील सर्व माहिती एका क्लिकवर आयकर विभागाकडे उपलब्ध आहे. या माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यातून वेळेवर कर भरणारे आणि कर भरत नसलेल्यांची यादी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रधान मुख्य आयकर आयुक्त जैन यांनी केले.
जैन म्हणाले
- कर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
- नागरिकांनी जास्तीत जास्त कर भरावा, यासाठी शासनाने विविध योजना बनविल्या आहेत.
- कररूपी महसुलातून आरोग्य, संरक्षण, शिक्षण, रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, दळणवळण, आदी क्षेत्रांच्या विकासासाठी केला जातो.
- नागरिकांनी कर भरून देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे.
- देशात २२ आयकर सेवा केंद्रे कार्यन्वित