कोल्हापूर , दि. २६ : दुचाकीवरून शिकवणीला जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून त्यांतील एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी एक्स्टेन्शन रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात संबंधित मुलगी किरकोळ जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर नागरिकांची गर्दी होताच अज्ञात दोघे तरुण त्यांच्या दुचाकीवरून पसार झाले. याबाबतची फिर्याद संबंधित मुलीने दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. संशयित हल्लेखोर अज्ञात तरुण अंदाजे २० ते २२ वर्षांचा आहे. त्याने निळ्या रंगाची जिन्स आणि फिकट रंगाचा शर्ट परिधान केला असून, त्याने बारीक दाढी राखल्याचे वर्णन या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका उच्चभ्रू वस्तीतील ही अल्पवयीन मुलगी आईवडिलांसमवेत राहते. ती सध्या शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती शाहूपुरी परिसरात दुचाकीवरून शिकवणीला येते. दोन महिन्यांपासून आपल्या मागावर एक अज्ञात तरुण असल्याची जाणीव त्या मुलीला झाली होती. काही दिवसांनंतर संबंधित तरुणाने एकतर्फी प्रेमातून धमकी दिली. दरम्यान, हा प्रकार तिने घरच्यांना सांगितला.
गुरुवारी सकाळी संबंधित मुलगी दुचाकीवरून शाहूपुरी एक्स्टेन्शन येथील रस्त्यावरून शिकवणीला जात होती. याच वेळी अज्ञात दोघे तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिच्याजवळ आले व त्यांनी आपली दुचाकी तिच्या दुचाकीच्या आडवी घालून तिला अडविले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती मुलगी भांबावली.
एकतर्फी प्रेमातून अज्ञात तरुणाने अल्पवयीन मुलीच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ती जखमी झाली. याच सुमारास तेथील रस्त्यावरून दोन नागरिक जात होते. मुलीने आरडाओरड करीत मदतीसाठी त्यांना हाक मारली.
ते दोघेजण येताच अज्ञात हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी तिला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुग्णालयाने हा प्रकार पोलिसांना कळविला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीचा जबाब घेतला. त्यानुसार अज्ञाताविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम ३५४ (ड) (विनयभंग), कलम ३२४ (मारहाण), कलम ५०६ (धमकी), इ कलम ३४ (समान हेतू) अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.
अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरूभरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे शाहूपुरी एक्स्टेन्शन परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस अज्ञात संशयित हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.