समीर देशपांडेकोल्हापूर : समाजसुधारणेसाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा विदर्भामधील पहिला पुतळा अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या शहरामध्ये उभारण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने दि. १७ डिसेंबर १९१७ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी विदर्भाचा (खामगाव)दौरा केला होता. त्याला २७ डिसेंबर २०१७ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली.
या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले होते. शिक्षणाशिवाय चांगला शिक्षक, चांगला शेतकरी, चांगला सैनिकही तयार होणार नाही. यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अशी विदर्भामध्ये पहिली मांडणी शाहू महाराजांनी केली होती.या परिषदेला त्यावेळी उपस्थित असलेले तरुणवयातील पंजाबराव देशमुख भारावून गेले आणि या भाषणांतूनच प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्या. या शाहू महाराजांच्या भाषणाला आणि विदर्भ दौऱ्याला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शाहूप्रेमी भाऊसाहेब पोटे यांच्या प्रेरणेने हा पुतळा या शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आला आहे. या शिक्षण संस्थेचेही हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून पोटे हे डॉ. पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचेही सल्लागार आहेत.डॉ. पवार आणि पोटे यांच्यामध्ये गेल्यावर्षी याबाबत चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याकडे या पुतळ्याचे काम देण्याचा निर्णय झाला. पुरेकर यांनीही हे काम पूर्ण करून पुतळा अकोटकडे पाठविला आहे.
कोल्हापूरवासीयांसाठी आनंदाची बाबविदर्भामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पहिला पुतळा उभारला जातोय; ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली आहे. काळाच्या पुढे पाहणाऱ्या या राजाच्या आवाहनामुळे विदर्भामध्ये शैक्षणिक क्रांती झाली. त्याविषयीची कृतज्ञता म्हणूनच हा पुतळा अकोटमध्ये उभारला जात आहे.