समीर देशपांडे ।कोल्हापूर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत मोफत होणारी सोनोग्राफीही आता अधिक सुलभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने रेडिओलॉजी अॅँड इमेजिंग असोसिएशनला सोबत घेऊन ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याच पद्धतीने राज्यभरात कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गरोदर महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा एक भाग म्हणून दुसºया व तिसºया महिन्यात त्यांची सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक असते. ३४ ते ३६ आठवड्यांमध्ये ही तपासणी केल्यास बालकामध्ये असणाºया जन्मत: व्यंगाचे त्वरित निदान होऊन त्यावर उपचारही करता येणे शक्य असते.
याआधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्य होईल त्या डॉक्टरांकडे जाऊन ही सोनोग्राफी तपासणी केली जात होती. त्यासाठी प्रत्येक तपासणीमाग डॉक्टरांना २०० रुपयांचे मानधन दिले जात होते. खासगी पद्धतीने ही तपासणी केल्यास अधिक पैसे घेतले जातात. त्यामुळे या रकमेमध्ये वाढ करण्याचीही मागणी होत होती.
याची दखल घेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी बैठक घेऊन सांगोपांग चर्चा केली. त्यानुसार डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजी अॅँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण कित्तुरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येत शासनाच्या वाढीव एकूण ४०० रुपये मानधनावर काम करण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे आता कोल्हापूर जिल्ह्यातील १७ खासगी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी झाल्यानंतर रुग्णालयांची यादी तसेच सोनोग्राफी करण्याबाबतचे पत्रही दिले जाईल. गरोदर मातांना जिथे सोयीचे असेल तिथे त्यांनी सोनोग्राफी करून घ्यावयाची आहे. यानंतर ४०० रुपयांप्रमाणे त्या-त्या रुग्णालयला रक्कम अदा केली जाणार आहे. याच पद्धतीने राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून सोनोग्राफीचे नियोजनकरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी एका सोनोग्राफीसाठी २०० रुपये मानधन दिले जात होते. मात्र आता त्यामध्ये २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वास्तविक, या तपासणीसाठी किमान १ हजार रुपये घेतले जातात. मात्र ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना’ला सहकार्य करण्यासाठी आमच्या असोसिएशनच्या जिल्ह्यातील १७ सदस्यांनी इतक्या कमी रकमेमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, अध्यक्ष, डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशन, कोल्हापूर