कोल्हापूर : मला संपवायचे की नाही जनताच ठरवेल : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:50 AM2018-09-26T00:50:37+5:302018-09-26T00:51:13+5:30
मला राजकीय पटलावरून संपवू, अशी दर्पोक्ती महाडिक यांनी करू नये; कारण हा मुश्रीफ दलाल व व्यापाऱ्यांच्या पाठबळावर राजकारणात उभा राहिलेला नाही.
कोल्हापूर : मला राजकीय पटलावरून संपवू, अशी दर्पोक्ती महाडिक यांनी करू नये; कारण हा मुश्रीफ दलाल व व्यापाऱ्यांच्या पाठबळावर राजकारणात उभा राहिलेला नाही. मला संपवायचे का उभारी द्यायची, याचा निर्णय या जिल्ह्यातील गोरगरीब जनताच घेईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सायंकाळी लगावला.
महादेवराव महाडिक यांचे गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार व व्यक्तिगत धंदे बाहेर काढावयाचे झाल्यास एक भलीमोठी अखंड कादंबरी होईल. अशांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, अशीही टीका मुश्रीफ यांनी केली. महाडिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यास मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिले.
पत्रकात म्हटले आहे, ‘केवळ आपल्या बदनामीसाठी खोटे व गंभीर आरोप करणाºया महाडिक यांच्यावर पाच कोटींचा बदनामीचा दावा दाखल करणार आहे. आठ दिवसांत आरोपांबद्दल वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.’
गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन्ही नेत्यांनी अट्टाहासाने ठेवला आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्याला विरोध करण्याचा मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला. विशिष्ट वळणावर संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता, याचा अर्थ हा संघ मल्टिस्टेट करून घशात घाला असा नव्हे. जनतेच्या भावना मीही व्यक्त केल्या, तर माझे वक्तव्य यांच्या मनाला एवढे का लागावे, असा सवालही त्यांनी केला.
महाडिक हेही जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनाही हैदराबाद व दुबई दौºयाबाबत माहिती घेण्याचा अधिकार आहे. बँकेमध्ये आतापर्यंत हार्डवेअरची खरेदीच झालेली नाही. संचालकांच्या सहली या स्वखर्चातून झाल्या आहेत. महाडिक हे सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुलेच आहेत. त्यांनी कधीही या विषयांची ‘सीआयडी’ चौकशी लावावी आणि तो खर्च झालेला पैसा स्पॉन्सर्ड होता की व्यक्तिगत होता हे त्यांनी शोधावे. बँकेच्या संचालक मंडळाच्या सहलीच्या संदर्भाने महाडिक यांनी केलेल्या खोट्या व गलिच्छ आरोपामुळे बँकेच्या संचालक मंडळाची नाहक बदनामी झाली आहे. या सहलीमध्ये संचालक मंडळातील भगिनीही होत्या, याचे भान त्यांनी बाळगावे.’
केडीसीसी बँकेतून माझ्या मुलाच्या नावावर विमा घेतला जातो, असा आरोप करणाºया महाडिक यांनी माहिती घेऊन बोलावे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, ‘आपले झाकण्यासाठीच चुकीचे वक्तव्य करून बदनामी करण्याचा महाडिक यांचा डाव कदापिही चालू देणार नाही. बँकेत आम्ही भत्ता घेत नाही आणि कसलाही अवांतर खर्चही करीत नाही. महाडिक यांनी स्वत:चे झाकण्यासाठी बँकेची नाहक बदनामी करू नये.’
पुतण्याला पराभूत करण्यासाठीच आरोप?
महाडिक ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आरोप करीत आहेत ते पाहता त्यांना पुतण्या धनंजय महाडिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने पराभव करावा असे वाटते का, अशी शंका येत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
स्वत:चीच लाज वाटली
‘गोकुळ’मधून महाडिक यांना कोणते फायदे मिळतात, हे बच्चा-बच्चा जानता है. आयुष्यात मी नोकरभरतीत साधा चहासुद्धा पिऊन लाजीम झालो नाही; परंतु ‘गोकुळ’च्या भरतीत पंधरा ते वीस-वीस लाख रुपये घेऊन यांनी दुकान उघडले. हे ऐकून मला स्वत:चीच लाज वाटली.