कोल्हापूर : जनताच सरकारला आॅनलाईनने घालवेल- हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:43 PM2018-06-08T17:43:36+5:302018-06-08T17:43:36+5:30
राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल्याने वैतागलेली जनता आता सरकारलाच आॅनलाईनने घालवेल. असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा सांगता समारंभ होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
साखर पॅकेजची खिल्ली उडवत ह सन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे साखर उद्योगाच्या डोळयात धूळफेक आहे. सामान्य माणसाला अल्प व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा, यासाठी राष्ट्रीयकृत बॅँका सुरू झाल्या पण आता उद्योगपतींनीच या बॅँका बुडविल्या.
सरकारची कामगिरी पाहता आता लहान मुलाला विचारले तरी हे सरकार जाणार असेच सांगेल. त्यामुळे सरकारविरोधात आक्रमकपणे बाहेर पडले पाहिजे. रविवारी पुण्यात होणाऱ्या हल्लाबोल सांगता मेळाव्याला जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेची कोल्हापूरातून सुरूवात झाली. त्याची सांगता पुण्यात होत असून कार्यकर्त्यांनी ताकदीने सहभागी व्हावे. माजी खासदार निवेदिता माने, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संगीता खाडे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी नियोजनाचा आढावा घेतला. माजी आमदार के. पी. पाटील, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, भैया माने, मधूकर जांभळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, शिवानंद माळी, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. रोहित पाटील यांनी आभार मानले.