कोल्हापूर : आरोग्य परिचरांना ६०००रुपये मानधन करावे, यासह विविध मागण्यांसाठी करवीर कामगार संघातर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवून आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी ‘हमारी युनियन हमारी ताकद...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी राहुल चिकोडे यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलकांकडून निवेदन स्विकाले व आठ दिवसात पालकमंत्र्यांसमवेत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रातील आरोग्य परिचर यांच्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. या परिचर गरीब परितक्त्या, बेघर, शेतमजूर कुटूंबातील आहेत. त्यांना दरमहा १२०० रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते.
त्यांना किमान ६००० रुपये मानधन मिळावे या ६ जानेवारी २०१७ च्या शासकिय परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, त्यांना सेवेत कायम करावे,मानधनाची रक्कम थेट बॅँकेत जमा करावी, निवृत्ती पेन्शन ३००० रुपये मिळावी, कामगार कल्याण मंडळाचे लाभार्थी कार्ड मिळावे व शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा अशा मागण्यांचा समावेश आहे.सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून आरोग्य परिचर संभाजीनगर बसस्थानक येथे जमायला सुरुवात झाली. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास बसस्थानक येथून पालकमंत्री यांच्या संभाजीनगर येथील घराकडे जाण्यासाठी मोर्चाला सुरुवात झाली.
‘हमारी युनियन हमारी ताकद...’, ‘लाल बावटे की जय...’, ‘कोण म्हणतय देत नाही...घेतल्याशिवाय राहात नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान पालकमंत्री पाटील यांचे म्हणून प्रतिनिधी राहुल चिकोडे मोर्चाला सामोरे आंदोलकांचे निवेदन स्विकारले.
यावेळी करवीर कामगार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने पालकमंत्र्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करुन मागण्या मान्य कराव्यात असे सांगितले. यावर तातडीने निवेदनाचा मेल पालकमंत्र्यांना केला जाईल. यानंतर काही अंतर गेल्या संभाजीनगर बसस्थानकाबाहेर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.