कोल्हापूर : आॅस्ट्रियातील (युरोप) केलगनफर्ट येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने बारावा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन या खेळाडूंनी यश मिळवीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला.शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅनचा किताब पटकविला. त्यामध्ये (कंसात स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केल्याची वेळ) : आदित्य शिंदे (१० तास ५२ मिनिटे ४५ सेकंद), रौनक पाटील (१४:४: २०), आशिष तंबाके (१४:४:८), डॉ. प्रदीप पाटील (१५:३२:२६), स्वप्निल माने (१४:४८:५८), उदय पाटील (१५:३३:५), डॉ. संदेश बागडी (१५:२९:२१), डॉ. विजय कुलकर्णी (१५:३१:४३), विनोद चंदवाणी (१५:३२:२६), महेश मेटे, विशाल कोथळे (१५:५८:४५), चेतन चव्हाण, सत्यवान नणावरे, बलराज पाटील यांचा समावेश आहे.
‘आयर्न किड’ ही स्पर्धा १५ वर्षांखालील गटासाठी झाली. त्यात वरद पाटील आणि नीरव चंदवाणी यांनी शंभर मीटर जलतरण आणि २.२ किलोमीटर अंतर २० मिनिटांमध्ये धावणे हे पूर्ण करून अनुक्रमे चौथा आणि बारावा क्रमांक मिळवून बाजी मारली. या स्पर्धेत उदय पाटील आणि वरद पाटील या बाप-लेकांनी सहभागी होऊन यश मिळविले.
युवा पिढीला शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने ‘आयर्नमॅन आॅस्ट्रिया’ या स्पर्धेत हे सर्व स्पर्धक पहिल्यांदाच सहभागी झाले होते. कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे सदस्य असणाºया या स्पर्धकांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. दरम्यान, स्वप्नील माने, महेश मेटे, विशाल कोथळे हे इचलकरंजीतील असून, ते ‘आय एम फिट’ क्लबचे सदस्य आहेत. त्यांना महेश शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.
वर्षभरातील तयारीच्या जोरावर यश‘आयर्नमॅन’साठी या खेळाडूंनी गेल्या वर्षी जुलैमध्ये नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी सराव सुरू केला. राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत धावणे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अश्विन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली; तर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी वैभव बेळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग, तसेच संध्याकाळी पाच ते सात या वेळेत सागर पाटील जलतरण तलाव येथे नीळकंठ आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जलतरणाची तयारी केली.
त्यासह दर रविवारी कोल्हापूर ते हत्तरगी, निपाणी-संकेश्वर असे १२० ते १५० किलोमीटर सायकलिंग ते करीत होते. या तयारीच्या जोरावर ‘आयर्नमॅन’ किताबावर या खेळाडूंनी नाव कोरले.
खेळाडूंचा कस लागलाया वर्षी ‘आयर्नमॅन आॅस्ट्रिया’मध्ये जगभरातील विविध ५० देशांतील ३००० स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धकांचा थंड पाण्यामध्ये ३.८ किलोमीटर जलतरण, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग हे १७ तासांमध्ये पूर्ण करताना कस लागला.