कोल्हापूर : ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.पोलीस उद्यानामध्ये गतवर्षी महाराष्ट्र दिनी हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज उभारला गेला; मात्र हा तिरंगा सातत्याने फडकवत ठेवला जात नसल्याने नागरिकांतून याबाबत सातत्याने विचारणा होत होती.या पार्श्वभूमीवर सुजय पित्रे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ३0३ फूट उंचीचा हा ध्वज उभारताना सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेतली होती. कोल्हापूरच्या वातावरणाची सरासरी काढून ताशी २५ किलोमीटर वारे वाहण्याजोग्या परिस्थितीमध्ये ध्वज, त्याचा आकार, मटेरियल याचे नियोजन केले होते. मात्र सध्या ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने ध्वज आणि स्तंभ याच्यात मोठा तणाव निर्माण होतो; त्यामुळे ध्वज फाटण्याचा संभव असतो.
गेल्या काही दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग, ध्वज चढवताना आणि उतरवताना होणारा त्रास, ध्वजाचे होणारे नुकसान याचा विचार करून याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून, त्यांनीही सातत्याने ध्वज फडकवणे धोकादायक असल्याचे सांगितले आहे.एका ध्वजाची किंमत ८२ हजार रुपये असल्याने मोठ्या वाऱ्यात जर सतत ध्वज फाटत राहिला तर आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे नाही. केंद्र शासनाचे ध्वजासंदर्भातील नियम याचाही विचार केला गेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून वेगवान वाऱ्यावेळी ध्वज उतरवला जातो.
मुंबईतील राजभवन किंवा वाघा बॉर्डर येथील ध्वजही नियमित फडकवता येत नाहीत. त्यामुळे विशिष्ट प्रसंग, दिन हे लक्षात घेऊन योग्य वातावरण असताना ध्वज फडकवला जातो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सुजय पित्रे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे.