कोल्हापूर : ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ पुस्तकांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 07:17 PM2018-03-21T19:17:15+5:302018-03-21T19:17:27+5:30
मुस्लिम बोर्डिंगमध्ये बुधवारी गिरीश फोंडे लिखित ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सभारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.
कोल्हापूर : सरकारची ही सर्व धोरणे शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात आहेत. या विरोधात रस्त्यावरच्या लढ्याशिवाय पर्याय नाही. नाही तर चुकीचे निर्णय आपल्यावर लादले जातील. याविरोधात लढण्यासाठी सर्वांना या पुस्तकांच्या माध्यमातून बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी केले.
मुस्लिम बोर्डिंगमध्ये बुधवारी गिरीश फोंडे लिखित ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सभारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.
गायकवाड म्हणाले, राज्य शासनाने १३०० सरकारी शाळा बंद करून खासगी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. यामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमाचा ते भंग करीत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार हे एकाच पक्षाचे असल्याने, त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही.
राष्ट्रीय आयफेटोचे अध्यक्ष प्रभाकर आरडे म्हणाले, शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढाई देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सरकारची दडपशाही मोडून काढली पाहिजे.
यावेळी खासगी शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष संतोष आयरे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष धादवड यांनी आभार मानले. याप्रसंगी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षण बचाव नागरी कृती समितीचे सुभाष जाधव, लेखक गिरीश फोंडे, सुधाकर सावंत, संजय पाटील, राजेंद्र कोरे, राजेश वरक, आदी उपस्थित होते.