कोल्हापूर : राजारामपुरी येथील दोन तरुणांच्या गटात पूर्ववैमनस्यातून जोरदार राडा झाला. यावेळी फायटरने केलेल्या हल्ल्यात अर्जुन जगन्नाथ बुचडे (वय ३०, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर परिसरातीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्व्यात घेतले आहे. मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वत: राजारामपूरी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी सक्त सूचना दिल्या. या वातावरणामुळे राजारामपूरीत अद्यापही तणाव आहे. दरम्यान, या सारख्या घटना सातत्याने घडत असून नागरिक त्रस्त आहेत. परिणामीा पोलिसांनी अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
दरम्यान, या राड्यानंतर राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील दोनशेजणांच्या जमावाने राजारामपुरी मेन रोडवरील बंद दुकानांवर दगडफेक करत या मार्गावर पार्किंग केलेल्या चार दुचाकी आणि सहा चारचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या प्रकाराने परिसरात तणाव पसरला आहे. रात्री उशिरापर्यंत परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
अधिक माहिती अशी, अर्जुन बुचडे हा राजारामपुरी येथील एका कापड दुकानात नोकरी करतो. त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. तो सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर त्याला गेंड्या, पक्या नावाच्या मित्रांनी माऊली पुतळ्याजवळ फोन करून बोलावून घेतले. त्याठिकाणी गेल्यानंतर पाच ते सहा जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत फायटरने तोंडावर हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला श्वासही घेता येत नसल्याने राजारामपुरी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीचा प्रकार समजताच तिसºया गल्लीतील दोनशे जणांचा जमाव रस्त्यावर उतरला. मेनरोडवरील बंद दुकानांना लक्ष्य करत दगडफेक करत तोडफोड केली. या मार्गावरील चार दुचाकी आणि आठव्या गल्लीतील सहा चारचाकींची तोडफोड केली.
यावेळी दुसºया गटाचे तरुण रस्त्यावर उतरल्याने जोरदार राडा झाला. या प्रकाराची माहिती समजताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजंूच्या जमावाला हटकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. अखेर जादा पोलिसांची कुमक बोलावून जमावाला शांत केले. बुचडे याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याच्या नातेवाईक, मित्रांनी रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती तर आठव्या गल्लीमध्येही लोकांनी गर्दी केली होती. अचानक राडा झाल्याने या परिसरातील नागरिकांत भीती पसरली. या घटनेमुळे तणाव पसरला असून रात्री उशिरापर्यंत सशस्त्र बंदोबस्त तैनात केला होता. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
नागरिकांच्या वाहनांची तोडफोडराजारामपुरी आठव्या गल्लीमधील रहिवाशांनी आपली वाहने घरासमोर पार्किंग केली होती. अचानक या वाहनांवर दगड पडल्याने ते बाहेर पळत आले. दोनशे जणांचा जमाव बघून त्यांनी दरवाजे बंद करून स्वत:ला कोंडून घेतले. जमावाचा आवाज शांत झाल्यानंतर या गल्लीतील लोक बाहेर आले. पाहतात तर आठ वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. या वाहनधारकांचा वादावादीमध्ये काडीमात्र संबंध नसताना त्यांची वाहने फोडण्यात आली.