कोल्हापूर : रंगसुरांच्या मैफलीला आला बहर...- ‘रंगबहार’चे आयोजन, दि. वि. वडणगेकर यांना जीवनगौरव प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:30 PM2018-01-22T18:30:39+5:302018-01-22T18:38:00+5:30
रविवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गाचे देणे लाभलेल्या टाउन हॉल म्युझिअम बागेत ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभव दिला. यावेळी दि. वि. वडणगेकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर : रविवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गाचे देणे लाभलेल्या टाउन हॉल म्युझिअम बागेत ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभव दिला. यावेळी दि. वि. वडणगेकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर व विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. डॉ. प्रवीण हेंद्रे व संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते दि. वि. वडणगेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजेय दळवी, विजय टिपुगडे, रियाज शेख, विजयमाला पेंटर, आशालता पेंटर, विश्रांत पोवार, आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, अशोक पालकर, सर्जेराव निगवेकर, धनंजय जाधव, सागर बगाडे, अतुल डाके, संजीव संकपाळ, अमृत पाटील उपस्थित होत्या.
‘रंगसुरांच्या मैफली’ची सुरुवात तबलावादक प्रशांत देसाई यांच्या तबलावादनाने झाली. दुसरीकडे चित्र, शिल्प, रंगावलीकारी, ओरिगामी कलाकारांनी आपापल्या कलाविष्काराला सुरुवात केली. कुणी शिल्प बनवत होते, कुणी विविध वस्तूंपासून म्युरल्स साकारली.
चित्रकारांनी कॅनव्हासवर आपल्या कुंचल्याने रंगरेषांचे फटकारे मारत निसर्गचित्र, पोर्ट्रेट, टाउन हॉल म्युझिअम अशा विविध प्रकारांत आपली चित्रकला साकारली. ‘रंगावली’कार सूर्यकांत पाटील यांनी रांगोळीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येविषयी जागृती केली; तर अमृत रासम यांनी मुक्त रांगोळी काढली. मंदार वैद्य यांनी ओरिगामी कला सादर केली.
एकीकडे नामवंत, नवोदित कलाकारांकडून कलेची मुक्त उधळण, तर दुसरीकडे छंद म्हणून नुकताच हातात घेतलेला ब्रश, त्यातून मनात येईल ती कलाकृती कागदावर रेखाटणारे बालकलाकार असे चित्र पाहावयास मिळाले.
सकाळपासूनच पालकांसमवेत त्यांनी हजेरी लावली होती. आपल्या मनात असलेल्या प्रतिमांना रंगांच्या साहाय्याने वास्तवात उतरविण्यात ते दंग होते. त्यात काहीजण निसर्गचित्रे, तर काही पुस्तकांतील चित्रे जशीच्या तशी काढण्याचा प्रयत्न करीत होते. प्रशांत देसाई यांच्यानंतर शास्त्रीय गायिका गौरी पाध्ये यांनी गायनाविष्कार सादर केला.
चित्रकार नेहा बन्सल, अरिफ तांबोळी, आदिती कांबळे, प्रीतेश चिवटे, सत्यजित पाटील, स्वरूप कुडाळकर, आकाश गाडे, समाधान रेंदाळकर, भाऊसाहेब पाटील, स्वप्निल पाटील यांनी सुरेख चित्रे रेखाटली; तर शिल्पकार म्हणून अजित चौधरी, अभिलाष भालेराव, सागर सुतार, किरण कुंभार, विजय कुंभार, अभिजित कुंभार यांनी व्यक्तिशिल्प साकारले. मांडणशिल्प कलाकार दीपक भुर्इंगडे यांनी साकारले.
रसिकांची गर्दी...
या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजल्यापासूनच रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कलाकार साकारत असलेल्या कलाकृती न्याहाळताना त्या रंगरेषांमध्ये हरवून जात होते. मानवी मनाच्या संकल्पना चित्र-शिल्पांतून उतरविणाऱ्या कलाकारांचे वेगळेपण अचंबित केल्याशिवाय राहत नव्हते. खास या कार्यक्रमासाठी अन्य शहरांतील कलाकार व रसिक कोल्हापुरात आले होते.