कोल्हापूर : अंथरुणावर खिळून असणाऱ्या ९० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करणारा नराधम विष्णू कृष्णा नलवडे (वय ५०, रा़ नांगरवाडी, ता़ भुदरगड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती यु. कदम यांनी दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला दि. ४ मार्च २०१५ रोजी आपल्या वृद्ध आईला घरी ठेवून भावाकडे गेल्या होत्या. दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी विष्णू नलवडे याने फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन वृद्धापकाळाने, शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व घरी अंथरुणास खिळून राहिलेल्या वृद्धेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अमानुषपणे जबरी बलात्कार केला.
यावेळी शेजारी राहणाऱ्या लोकांनी नलवडे याला रंगेहात पकडून भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याला त्याच्या कपड्यांची विचारणा केली असता त्याने कपडे पीडित महिलेच्या अंथरुणात असल्याचे बोट करून दाखविले. त्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाने आपला गुन्हा शाबित करण्यासाठी एकूण नऊ साक्षीदार तपासले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह भुदरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी एम. एस. घाडगे, सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ, हवालदार तुकाराम पाटील, पोलीस निरीक्षक बी़ टी़ बारवकर यांचेसह इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी मांडलेला युक्तिवाद व वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे व प्रत्यक्ष झालेला पुरावा ग्राह्य मानून, न्यायाधीशांनी आरोपी विष्णू नलवडे याला आजन्म कारावसाची शिक्षा ठोठावली.अॅड. पिरजादे यांचा युक्तिवादशिक्षेच्या मुद्द्यावर सरकारी वकील ए. एस. पिरजादे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पीडित वृद्धा ही अंथरुणावर खिळून होती. तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन या नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला आहे. आरोपीचे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपीचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे.
तो सुधारण्याच्या पलीकडे आहे. त्याचे कृत्य हे फक्त एका महिलेविरुद्ध नसून ते संपूर्ण समाजाविरोधी आहे. महिलांच्या आत्मसन्मान व प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे आहे. या महिलेवर अतिप्रसंग हा आरोपीची क्रूर मानसिकता दर्शविणारा आहे. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.शेवट कारागृहातचआरोपी विष्णु नलवडे याला आरोपीच्या व्हिटनेस बॉक्समध्ये उभे केले. त्याला न्यायाधिश अदिती कदम यांनी तुमच्यावरील दोषारोप सिध्द झाला आहे. त्यामध्ये देहदंडाची शिक्षा आहे. मात्र, तपास यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला फाशीची शिक्षा देता येत नाही. तुमचे उर्वरीत नैसर्गिक आयुष्य असे पर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा देत असल्याचे सांगितले. त्यानुसार नलवडेची कळंबा कारागृहात रवानगी केली. त्याचा श्वासाचा शेवटची कारागृहतच होणार आहे.