कोल्हापूर : शहरातील कपिलतीर्थ, शिंगोशी मार्केट, शाहू उद्यान, राजारामपुरी, रेल्वे फाटक, संभाजीनगर, पाडळकर मार्केट येथील भाजीमंडईतील गैरसोयी त्वरित दूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन बुधवारी बी वॅर्ड अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.भाजी मंडईतून भटक्या जनावरांचा वावर असून तो बंद करावा, मंडईना आवश्यक तेथे गेट बसवावीत, मंडईतील स्वच्छता काटेकोरपणे केली जावी, विक्रेत्यांना बसण्यासाठी तयार केलेल्या पत्र्यांची शेड, कट्ट्यांची दुरूस्ती करण्यात यावी, महिलांच्या सुरक्षेकरीता तातडीने सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची पूर्तता करावी, अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात कृती समितीचे किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, जयकुमार शिंदे, राहुल चौधरी, प्रशांत बरगे, शीतल धनवडे, गुरुदत्त म्हाडगुत, पद्माकर कापसे, प्रसाद जोशी यांचा समावेश होता.