कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने काही नगरसेवक अपात्र केल्याची चर्चा सुरू आहे; पण ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून, संबंधित नगरसेवकांना महापौर निवडीत मतदान करण्यापासून न्यायालय वगळता कोणीही रोखू शकत नाही. तसा प्रयत्न केला, तर याद राखा.
शहरात कायदा-सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल, त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेच जबाबदार राहतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला. मंत्री पाटील यांनी अजूनही निर्णय बदलून लोकशाहीची बूज राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.महापौर निवड सोमवारी (दि. १०) होत असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका वर्तुळात जोरदार उलथापालथ सुरू आहे. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने पाच, तर राष्ट्रवादीचा व्हीप डावलून ‘स्थायी’ सभापती निवडीत मतदान केल्याबद्दल दोन, अशा सात नगरसेवकांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांनी भाजप व पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.मुश्रीफ म्हणाले, महापालिका आयुक्तांनी सर्व नगरसेवकांना सोमवारच्या निवडीबाबत नोटिसा लागू केल्या आहेत. त्यानंतर जरी सरकारने बेकायदेशीररीत्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना सभेत मतदान करण्यापासून न्यायालयाशिवाय कोणी रोखू शकत नाही.
लोकशाहीमध्ये जय-पराजय मान्य करावा लागतो; पण अशा पद्धतीने लोकशाहीची थट्टा भाजपने करणे योग्य नाही. याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. कायद्याच्या चिंधड्या उडवण्याचा उद्योग केला असून, सत्ता येते जाते; पण अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम करावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.अधिसूचनेवर आयुक्तांनी सरकारकडे मार्गदर्शन मागवले, तोपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्याबाबत कायदा झाला; त्यामुळे अधिसूचनेला काहीच अर्थ राहत नसल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले.‘त्यांची’ ‘नोबेलसाठी शिफारस करणार होतोमहापौर निवडीत प्रलोभने न दाखविता, प्रेमाने जे आमच्याकडे येतील, त्यांना सोबत घेऊ, अशी ग्वाही भाजपच्या गट नेत्यांनी दिल्याने त्यांची शिफारस ‘नोबेल’साठी करावी, असे वाटत होते; पण त्यांनी सगळेच रंग दाखविल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.
लाटकरांना न्याय देऊमहापौर पदासाठी पाचजण इच्छुक असल्याने माझ्यासमोर धर्मसंकट होते. यातून राजेश लाटकर नाराज झाल्याचे समजते; पण ते राष्ट्र सेवा दलातून घडलेला कार्यकर्ता असल्याने ते निश्चित समजून घेतील. त्यांना न्याय देऊच, गवंडी, खेडकर यांनाही योग्यवेळी संधी देण्याचे ठरल्याने कोणीही नाराज नाहीत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
सरकारकडून ‘शब्दछल’जातवैधता प्रमाणपत्र मुदतीच्या अध्यादेशाबाबत सरकारकडून नुसता शब्दछल सुरू आहे. राज्यातील २00 हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा पेच असताना केवळ कोल्हापूर महापालिकेची फाईलवर कार्यवाही कसे होते? गांधीनगर प्रकरणात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर वाचल्या, आता बेकायदेशीर कारवाई केली तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नसल्याचा इशारा प्रा. जयंत पाटील यांनी दिला.
संख्याबळासाठीच पीरजादे, चव्हाण यांच्यावरील कारवाई मागेअफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्यावरील कारवाई शुक्रवारी सकाळीच विभागीय आयुक्तांकडून मागे घेतल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. कारवाई आणि माघारही कशी? असे विचारले असता, त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी आतापर्यंत माघार घेतली नव्हती. होय, संख्याबळासाठीच आता माघार घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शिवसेना आमच्यासोबतचशिवसेना आमच्या आघाडीत असून, त्यांना परिवहन सभापती पद दिलेले आहे. त्याबदल्यात ते ‘स्थायी’मध्ये सहकार्य करतात, आताही ते आमच्या सोबतच राहतील. ते उद्धव ठाकरेंचे बछडे आहेत, शब्द पाळतील, असे ठामपणे मुश्रीफ यांनी सांगितले.
खासदार मोठा माणूसमहापालिका निवडणुकीवेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर धर्मसंकट होते, त्यावेळी ते परदेशात गेले. आता तुमच्यासमोर धर्मसंकट असताना, तुम्ही काय करणार? असे विचारले असता, खासदार मोठा माणूस असल्याचा टोला मुश्रीफ यांनी हाणला.
राष्ट्रवादीसमोरच अडचणी का?राष्ट्रवादीच्या ‘स्थायी’ निवडीनंतर आता महापौर निवडीत पालकमंत्री पाटील आक्रमक कसे होतात, कॉँग्रेसच्या वेळी का नाही? यावर, त्यांना माझा तात्विक विरोध असतो, राजकारणात सत्तारूढ आणि विरोधक असतात. कदाचित त्यामुळे असे होत असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.