कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:57 PM2018-01-13T17:57:09+5:302018-01-13T18:04:11+5:30
कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हा वाद दलित आणि मराठा यांच्यात नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यावरून हिंदुत्ववाद्यांत अनियंत्रित आणि नियंत्रित असे दोन गट निर्माण झाले असून त्यातूनच या घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
हा वाद दलित आणि मराठा यांच्यात नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यावरून हिंदुत्ववाद्यांत अनियंत्रित आणि नियंत्रित असे दोन गट निर्माण झाले असून त्यातूनच या घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर दि. ३ जानेवारीला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवेळी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
ते सकाळी कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात भेट देणार होते; पण पोलिसांच्या आवाहनानुसार त्यांनी शासकीय विश्रामगृहावरच संघटनेच्या कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे चाकण आणि शिरूर मार्गावरून येणाऱ्या भीमसैनिकांना मारहाण केली. त्याबाबत या भीमसैनिकांना का मारले? याचे शासनाने उत्तरही दिलेले नाही अगर त्याबाबत गुन्हाही नोंदवून घेतलेला नाही.
तोच राग दुसऱ्या दिवशी गावा-गावांतून बाहेर पडला. त्यानंतर दि. ३ जानेवारीला पुकारलेला महाराष्ट्र बंद शांततेत झाला. काही ठिकाणी हिंसक वळणचे गालबोट लागले; पण ते कृत्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी जाणीवपूर्वक केले आहे. त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘महाराष्ट्र बंद’वेळी झालेल्या दंगलीवेळी पोलिसांनी काहीजणांवर दरोडेखोराचे, तर काहीजणांवर ३०७ कलम लावणे हा आतताईपणा आहे; पण त्यांतील अटक केलेल्यांची न्यायालयामार्फत आम्ही सुटका करून घेऊ, असेही ते म्हणाले.
चौकशी आयोगाचा न्यायमूर्ती ‘रबर स्टँप’ नसावा
संपूर्ण देशभरात निर्माण झालेले गैरविश्वासाचे वातावरण शासनाने प्रथम थांबवावे. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती जो न्यायाधीश नियुक्त करतील, तो आम्हाला मान्य असेल; पण तोे दलित नसावा, कार्यरत असावा. तो कोणाच्या दबावाखाली ‘रबर स्टँप’म्हणून राहणार नाही याची दक्षता घेऊ, असेही ते म्हणाले.
अन्यथा आम्हीच बंदोबस्त करतो
भारताचा पाकिस्तान होऊ नये यासाठी देशातील हिंदुत्ववादी संघटनांतील अंतर्गत वादातून निर्माण होणाºया हाफीज सय्यदना शासनाने वेळीच पायबंद घालावा. जर शासनाने त्यांचा बंदोबस्त केला नाही, तर आम्हीच जनतेला आवाहन करून त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.
देशात यादवीची शक्यता
देशापुढे आज मोठे संकट उभे आहे. त्यातून यादवी होण्याची शक्यता आहे. १ जानेवारी रोजी गाड्या जाळणं यालाच मी त्याची नांदी समजतो, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. नियंत्रित आणि अनियंत्रित हिंदू संघटनांच्या सहभागी वादातून हिंसक घटना घडल्या. अशा घटनेवेळी आतताईपणा केला तर त्याचा फटका निवडणुकीत बसतो याची जाणीव नियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांंना असल्याने ते मर्यादा राखून आपला अजेंडा पुढे नेतात.
‘पेपर टायगर’
रामदास आठवले यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अॅड. आंबेडकर म्हणाले, मी यापूर्वी राजा होतो, आताही आहे अणि पुढेही राजाच असेन. ‘ते’ पेपर टायगर आहेत, त्यांना मीडियाने मोठे केले आहे. त्यांना तुमच्याजवळ ठेवा, असेही ते म्हणाले.