दिल्लीतील शेतकरी लढ्याला कोल्हापूर सिटूचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:20 PM2020-11-28T20:20:38+5:302020-11-28T20:22:17+5:30
farmar, kisanmorcha, kolhapurnews शेती, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधासाठी दिल्लीत शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याला कोल्हापुरातील सिटू कामगार संघटनेने शनिवारी बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून सक्रिय पाठिंबा दर्शविला.
कोल्हापूर : शेती, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधासाठी दिल्लीत शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याला कोल्हापुरातील सिटू कामगार संघटनेने शनिवारी बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून सक्रिय पाठिंबा दर्शविला.
केंद्र सरकारने शेती, कामगार कायद्यापाठोपाठ वीज विधेयक आणण्याचे धोरण आखले आहे. स्वस्त दरामध्ये वीज मिळणे बंद होणार आहे. धनदांडग्यांच्या दावणीला शेतकरी, कामगारांना बांधल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेलाही त्यात ओढले जात आहे. सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध करत पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत लाखोंच्या संख्येने आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी दुपारी ह्यसिटूह्णप्रणीत सर्व कामगार संघटना बिंदू चौकात एकत्र जमल्या. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. यात धर्मा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, दत्ता माने, मोहन गिरी, शंकर काटाळे, उदय नारकर, संदीप सुतार, प्रकाश कुंभार, ज्योती तावरे, राजाराम आरडे, सुभाष कांबळे, गोपी पोला यांनी सहभाग घेतला.