कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेत पुन्हा विदेश विनिमय व्यवहार सुरू करण्यात आल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
रिझर्व्ह बॅँकेच्या मान्यतेने या व्यवहारासाठी राज्य बॅँकेने ‘नॉस्ट्रो खाते’ बॅँक आॅफ इंडियामध्ये उघडले होते. राज्य बॅँकेकडील बहुतांश विदेश विनिमय व्यवहार बॅँकेने कर्जपुरवठा केलेल्या सूतगिरण्या तसेच साखर कारखाने यांच्या आयात-निर्यात व्यवहारासाठी होते.अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्यानंतर अशा व्यवहारावर जागरूकपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कोणत्याही रकमेचे ‘मनी लॉँडरिंग’ होऊ नये व अतिरेक्यांना होणाऱ्या निधीचा पुरवठा थांबावा, यासाठी अमेरिकेने ‘पॅट्रिअॅक्ट’ लागू केला. या अॅक्टमुळे बॅँकांवर आयात-निर्यात व्यवहार हाताळताना बंधने आली.
या अॅक्टमुळे स्वत:चे खातेदार असलेल्या, खातेदारांचे आयात-निर्यात व्यवहार हाताळणे बॅँकेला क्रमप्राप्त ठरले. या अॅक्टमुळे राज्य बॅँकेचे बॅँक आॅफ इंडियामध्ये असलेले ‘नॉस्ट्रो खाते’ बंद केले. पुन्हा व्यवहार सुरू करण्यासाठी बॅँकेचे प्रशासकीय मंडळाने प्रयत्न सुरू केले होते.
६ जुलै २०१८ रोजी अमेरिकेतील ‘हबीब अमेरिकन बॅँक, न्यूयॉर्क’ या बॅँकेने राज्य बॅँकेचे ‘नॉस्ट्रो खाते’ सुरू केले आहे; त्यामुळे आता बॅँक पूर्ववत आयात-निर्यात व्यवहार सुरू केल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.