कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने जाहीर केलेली निवड यादी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी सोमवारी दुपारनंतर महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा कटआॅफ यंदा दोन टक्क्यांवर वाढला. विज्ञानचा एक टक्क्याने, वाणिज्य मराठीचा दोन टक्क्यांनी, तर कला शाखेच्या कट आॅफ चार टक्क्यांनी घसरला आहे.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय समितीतर्फे प्रक्रिया राबविण्यात आली. यावर्षीच्या प्रक्रियेचे मुख्य केंद्र असलेल्या शहाजी महाविद्यालयात समितीचे अध्यक्ष किरण लोहार, कार्याध्यक्ष डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी निवड यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
यावर्षी विज्ञान शाखेसाठी ५८०८ अर्ज प्राप्त झाले असून ते प्रवेश क्षमतपेक्षा ४४६ इतके जादा आहेत. त्यामुळे विज्ञानच्या मंजूर ६० तुकड्यांसाठी ६०० प्रवेश क्षमता वाढवून दिली आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी १८०८ अर्ज दाखल झाले. प्रवेश क्षमतेपेक्षा ६६८ अर्ज अधिक आहेत.
या पत्रकार परिषदेस समितीचे सचिव एस. आर. चौगुले, प्रा. राजेंद्र हिरकुडे, टी. के. सरगर, आर. बी. कोळेकर, बी. बी. पाटील उपस्थित होते. दरम्यान, न्यू कॉलेजने सलग दुसऱ्यांवर्षी प्रवेशाच्या टक्केवारीमध्ये विज्ञान शाखेत ९१.६० टक्के, वाणिज्यमध्ये ८०.४० टक्के, कला शाखेत ६६.२० टक्क्यांसह बाजी मारली. विवेकानंद महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकांवर आहे. राजाराम महाविद्यालय, कमला महाविद्यालय, गोखले कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज आहे.दरम्यान, सोमवारी दुुपारी तीननंतर कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि महाविद्यालयांच्या सूचनाफलकांवर निवड यादी प्रसिद्ध झाली. विद्यार्थी, पालकांनी यादी पाहण्यासाठी महाविद्यालयांमध्ये गर्दी केली.