कोल्हापूर : सूरज गुरव यांना निलंबित करा; अन्यथा जिल्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:45 PM2018-12-12T14:45:36+5:302018-12-12T14:46:29+5:30
राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांचा इशारा; अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी महापौर निवडणुकीवेळी राष्ट्र वादी-काँग्रेस नगरसेवकांना ...
राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांचा इशारा; अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी महापौर निवडणुकीवेळी राष्ट्र वादी-काँग्रेस नगरसेवकांना सभागृहात न सोडण्याची सुपारी घेतल्याचा आरोप राष्ट्र वादी-काँग्रेसच्या नेत्यांनी केला.
आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाची चौकशी करून त्यांच्यावर चार दिवसांत निलंबनाची कारवाई न केल्यास कोल्हापूर जिल्हा बंद करण्याचा इशाराही यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना निवेदनाद्वारे दिला. ‘मी निवेदन स्वीकारले आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करू,’ इतकेच उत्तर काकडे यांनी दिले.
सोमवारी (दि. १०) महापौर-उपमहापौर निवडीवेळी पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी आमदार मुश्रीफ यांच्याशी वादावादी केली. त्या पार्श्वभूमीवर महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांची भेट घेतली.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘कोणाच्या तरी दबावाखाली पोलिसांनी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांना वेळेत सभागृहात न सोडण्याचे षड्यंत्रच रचले होते; त्यासाठी उपअधीक्षक गुरव यांनी सुपारी घेतली असावी. आमदार मुश्रीफ यांच्याशी त्यांनी ज्या स्टाईलने वाद घातला, त्यावरून त्यांनी मद्यप्राशन केले असावे, अशी शंका येते.’
यावेळी माजी उपमहापौर महेश सावंत, नगरसेवक शारंगधर देशमुख, डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, संजय मोहिते, नियाज खान, जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, उत्तम कोराणे, विनायक फाळके, विक्रम जरग, इंद्रजित बोंद्रे, प्रकाश गवंडी, भैया माने, गणी आजरेकर, आदी जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन नंबरवाल्यांशी संबंध
उपअधीक्षक गुरव यांचे दोन नंबरवाल्यांशी साटेलोटे आहे. वारणा लूट प्रकरणासह त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.