कोल्हापूर : हेरले येथे चोरी, दुचाकीसह रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:10 PM2018-09-25T12:10:09+5:302018-09-25T12:13:28+5:30
हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले.
कोल्हापूर : हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बबन भाऊ कदम हे सेवानिवृत्त कर्मचारी शेती करतात. ते पत्नी, मुलगा रोहितसह माळ भाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करतात. सोमवारी रात्री तिजोरी जवळ दोघे झोपी गेले. मुलगा वरच्या मजल्यावर खोलीमध्ये झोपला.
दोनच्या सुमारास चोरांनी प्रथमतः गेटचे कुलूप तोडून मोळा बांधलेल्या काठीच्या साह्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. मुख्य दरवाज्याची कढी काढून चोरांनी तिजोरी उघडून दहातोळे सोन्याचे दागिने, पंधरा हजार रुपये रोकड व दुचाकी (क्र MH-09AR-6973), (क्र MH-09CF4065) चोरून पोबारा केला.
घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरांनी घरातील दहयाचा डबा व छोटी पाण्याची घागर घेऊन घरापासून अंदाजे शंभर मिटरवर दहयाचा आस्वाद घेत पर्स व इतर साहित्याची तपासणी करून त्या वस्तू तिथेच टाकून निघून गेले.
पहाटे शेजाऱ्याना कदम यांच्या घराचे गेट व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कदम यांना फोन लावला, ते जागे झाले, त्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे कळले. बबन कदम यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यास चोरीची वर्दी दिली. सकाळी घटना स्थळावर दाखल झालेल्या हातकणंगले पोलींसानी घराचा पंचनामा केला.
पोलींसानी चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. घरापासून दोन तीनशे मिटरपर्यंत माग काढून कोल्हापूर-सांगली मार्गापर्यंत श्वान घुटमळ्ले. मध्यवस्तीत धाडसी चोरीच्या प्रकाराने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेरले गावात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच बरोबर घरात धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने चोरटयांना जेरबंद करण्याचे आव्हान हातकणंगले पोलींसासमोर उभे आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल अधिक तपास करीत आहेत.