कोल्हापूर : साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:02 PM2018-12-31T14:02:33+5:302018-12-31T14:04:32+5:30
‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला.
कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला.
या प्रकरणी संशयित स्वप्नील तानाजी कानकेकर (वय २६, रा. बापूरामनगर, कळंबा, ता. करवीर), ज्योतीराम महादेव पाटील (३५, रा. कोगे, ता. करवीर), गणी नबीसो मुल्लाणी (३२, रा. शिरोली दुमाला, पोस्ट गल्ली, ता. करवीर) अशी मद्यतस्करांची नावे आहेत.
जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची निर्मिती कोठे करण्यात आली; यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे गोवा-कर्नाटक राज्यांत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी, दरवर्षी ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर गोव्याहून महाराष्ट्र-कर्नाटकात बेकायदेशीररीत्या विदेशी मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. करवीर तालुक्यातील काही गावांतील मद्यतस्करांनी गोव्याहून मद्यसाठा आणून ठेवला होता.
‘थर्टी फर्स्ट’ला त्याची ते विक्री करणार होते. या प्रकाराची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपविभागीय आयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यांनी निरीक्षक संभाजी बरगे व पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे सापळा रचला असता गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेने एक संशयित कार (एमएच ०२ बीपी २७४६) आली.
पोलिसांनी पाठलाग करून तिला थांबविले. त्यात संशयित स्वप्नील कानकेकर हा आढळून आला. कारमध्ये पाठीमागे ठेवलेले खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आले. ते उघडून पाहिले असता विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.
मद्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता यामध्ये विविध ब्रँडच्या व वेगवेगळ्या बॅच क्रमांक असलेल्या बाटल्या दिसून आल्याने संशय वाढला. सखोल चौकशी केली असता रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावटरीत्या तयार केलेले मद्य पुनर्भरण करून बुचे लावून नियमित किमतीपेक्षा कमी दराने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची कबुली संशयित कानकेकर याने दिली.
हे मद्य कोठून आणले अशी विचारणा केली असता त्याने ते कोगे येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार ज्योतीराम पाटील (कोगे) व गणी मुल्लाणी (शिरोली दुमाला) या दोघांच्या घरी एकाच वेळी छापा टाकून बनावट विदेशी मद्य जप्त केले.
वाहनांची कसून तपासणी
गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटर मद्यसाठा इकडे आणण्याचा बेतात आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
‘थर्टी फर्स्ट’साठी अशा प्रकारचे कमी किमतीत मिळणारे मद्य खरेदी करू नये. हे मद्य शरीरास अपायकारक असून, यामधून व्यक्ती दगावण्याची शक्यता आहे. आणखी कुठे अशा प्रकारे मद्यसाठा आहे काय, याची सखोल चौकशी पथकाकडून सुरू आहे.
गणेश पाटील,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर