कोल्हापूर : मुश्रीफ-संजय घाटगे भेटीचे तीन-चार अन्वयार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:22 PM2018-10-25T14:22:35+5:302018-10-25T14:24:09+5:30
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त्यामागील कारणांचा अन्वयार्थ लावत आहेत.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल हा तालुका गेली अनेक वर्षे केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे तिथे एखादी गोष्ट घडली तर त्याची चर्चा जिल्हाभर होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त्यामागील कारणांचा अन्वयार्थ लावत आहेत.
ढोबळ मानाने मुश्रीफ यांनी असे विधान करण्यामागे तीन-चार महत्वाची कारणे आहेत.
ती अशी : १)कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून मुश्रीफ यांचा राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीस विरोध आहे. त्यामुळे त्यांना प्रा. संजय मंडलिक हे उमेदवार हवे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारावी असे मुश्रीफ यांना वाटते परंतू ही रिस्क घ्यायला मंडलिक तयार नाहीत. कारण पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाडिक यांच्या उमेदवारीस बळ देत असल्याचे चित्र आहे.
भाजप- शिवसेनेची युती होण्याची शक्यता दाट आहे. अशा स्थितीत युतीची उमेदवारी मिळाली तर आपली बाजू बळकट होते असे मंडलिक यांना वाटते. कारण काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे मंडलिक यांना उघड पाठबळ देणार हे नक्की आहे. त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या पाठी नको म्हणून मंडलिक राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील मानसिक दबाव वाढविण्यासाठी मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.
२)कागल विधानसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगे हे सध्या फारच आग्रही आहेत. ही उमेदवारी त्यांना मिळणार की संजय घाटगे यांना याबध्दल जोरदार रस्सीखेच आहे. उमदेवारीवरून मुळ घाटगे गटात सध्या अंतर्गत संघर्ष आहे. सद्यस्थितीत मुश्रीफ विरुध्द समरजित घाटगे अशीच विधानसभेची लढत निश्चित झाल्याचे वातावरण तयार झाले आहे. या स्पर्धेत आजच्या घडीला तरी संजय घाटगे यांचे नांव मागे आहे. ही लढत तशीच झाली तर विधानसभेला संजय घाटगे गटाची आपल्याला मदत व्हावी. ती नाही झाली तरी किमान टोकाचा विरोध तरी होवू नये या बेरजेच्या राजकारणांतून मुश्रीफ यांना संजयबाबा यांच्याबध्दल प्रेमाचा उमाळा आला आहे.
३)समरजित घाटगे व संजय घाटगे या दोन नेत्यांमध्ये व दोन घाटगे गटातही विधानसभेच्या उमेदवारीवरून स्पर्धा आहे. समरजित यांनी मुश्रीफ हेच आपले राजकीय शत्रू असल्याचे जाहीर करून टाकून विरोधातला सगळा फोकस त्यांच्यावर केंद्रीत केला आहे. अशा स्थितीत मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्याबध्दल मवाळ भूमिका घेवून घाटगे गटातही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
४) मुश्रीफ लोकसभेची निवडणूक लढवण्याची फारच कमी शक्यता आहे. परंतू महाडिक यांना फारच विरोध झाला व पक्षाने त्यांना बदलायचा विचार केल्यास ही जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर येवू शकते. अशा स्थितीत कागल तालुक्यातून सगळेच गट विरोधात जावू नयेत, आपल्यासोबत कोणतरी असावे हा धोरणीपणांही या भेटीमागे असू शकतो.
५) मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ समारंभासही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना निमंत्रित करण्यामागेही असेच कारण आहे. सध्या समरजित घाटगे यांचा सगळा प्रचार हा ‘शाहूंचा खरा वारसदार..व थेट रक्ताचा वारस..’याभोवती केंद्रीत झाला आहे. त्याला छेद द्यायचा म्हणून मुश्रीफ यांनी मुद्दाम कोल्हापूरच्या मूळ शाहू महाराजांनाच कारखान्याच्या कार्यक्रमाला निमंत्रित करून आपणही शाहू घराण्यावर प्रेम करणारेच असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.