कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असलेली कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा रविवार (दि.१ ऑगस्ट)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्याची ऑनलाइन तिकीट नोंदणी सुरू झाली आहे. ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील दर्शनासाठी तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची प्रतीक्षा संपली आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सन २०१९ मध्ये इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा सुरू झाली. या सेवेला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर सलग दुसऱ्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत विमानसेवा सुरू राहिली. कोरोनामुळे तिरुपती मंदिर बंद असल्याने कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित झाली.
मंदिर आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे रविवारपासून ही विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या चार दिवस सेवा असणार आहे. तिरुपती येथून सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापूरमध्ये दुपारी १ वाजून ४० मिनिटांना पोहोचणार आहे. कोल्हापुरातून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी निघणारे विमान हे तिरुपती येथे दुपारी ४ वाजून ५ मिनिटाला पोहोचेल. या विमानात ७५ प्रवाशांच्या बैठकीची क्षमता आहे.