कोल्हापूर : आज खंडेनवमी, दसरा
By admin | Published: October 2, 2014 10:53 PM2014-10-02T22:53:01+5:302014-10-02T23:31:25+5:30
बाजारपेठ फुल्ल : खरेदीची लगबग; शाही सोहळ्याची तयारी पूर्ण
कोल्हापूर : आश्विन शुद्घ प्रतिपदेला घटस्थापनेपासून सुरू झालेला शारदीय नवरात्रौत्सवाचा अखेरचा टप्पा म्हणजे खंडेनवमी आणि सीमोल्लंघनाचा सोहळा. करवीर निवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी या दोन्ही देवतांची स्वतंत्र शस्त्रगृहे आहेत. खंडेनवमीनिमित्त उद्या, शुक्रवार या देवतांच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे.
कोलकाता, म्हैसूरप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा जगभरात प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर दसरा चौक येथील सीमोल्लंघनाच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, तर पूजेचे साहित्य खरेदी आणि मुहूर्ताला खरेदी करायच्या वस्तू पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी शहरातील बाजारपेठा आणि रस्ते फुलून गेले आहेत. यंदा एका तिथीचा क्षय झाल्याने खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आले आहेत.
उद्या पहाटेच्या अभिषेकानंतर १० वाजता देवस्थान समितीतर्फे तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टने आणलेला शालू, बांगड्या अंबाबाईला अर्पण करण्यात येईल. संध्याकाळी पाच वाजता अंबाबाई, तुळजाभवानी व गुरुमहाराजांची पालखी दसरा चौकात पोहोचेल. येथे श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे, संभाजीराजे यांच्या हस्ते शमीचे पूजन होईल. आरती आणि बंदुकीच्या फैरी झडून देवीला मानवंदना दिली जाईल. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. भवानी मंडपातील जुन्या राजवाड्यात छत्रपतींचा दसऱ्याचा दरबार भरेल. रात्री साडेनऊला देवीची पुन्हा पालखी निघेल.
मुहूर्त साधण्यासाठी बाजारपेठा सज्ज
विजयादशमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने शुभखरेदी केली जाते. त्यानिमित्त आज शहरातील गुजरीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने, वाहनांच्या शोरूम्स, अशी बाजारपेठांतील सर्व प्रकारची दुकाने ग्राहकांना इच्छित खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी सज्ज झाली आहेत. दरम्यान, नवरात्रौत्सवात मान असतो तो झेंडूंच्या फुलांचा. त्यामुळे बाजारात झेंडूंच्या फुलांची मोठी आवक झाली आहे. यासह खाऊची पाने, लव्हाळा, ज्वारीची धाटे, आपट्याची पाने या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, बिंदू चौक, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे मोठी गर्दी आहे.
शहरातील वाहतूक मार्गात बदल
उद्या, शुक्रवारी दसरा चौकात होणाऱ्या शमीपूजन सीमोल्लंघनासाठी तात्पुरता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, सीपीआर, स्टेशन रोड, स्वयंभू गणेश मंदिर चौकाकडून दसरा चौकात येणाऱ्या दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे, तर भाऊसिंगजी रोडने व शिवाजी पुलाकडून येणारी सर्व अवजड मोटार वाहनांची वाहतूक ही सीपीआर सिग्नल चौक, शाहू ब्लड बँक कॉर्नर मार्गे पुढे मार्गस्थ होतील. बिंदू चौक व लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक ही स्वयंभू गणेश मंदिर, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नरमार्गे पुढे मार्गस्थ होतील. स्टेशन रोडकडून व्हीनस कॉर्नर चौकाकडे येणारी सर्व वाहने लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरमार्गे मार्गस्थ होतील.
आदिशक्तीने आठ दिवस घनघोर युद्ध करून अष्टमीला महिषासुराचा वध केला. याचे प्रतीक म्हणून गुरुवारी करवीर निवासिनी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा सागर मुनिश्वर व रवी माईनकर यांनी बांधली.