कोल्हापूर : आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली.याप्रकरणी संशयित व्हॅनचालक शरद बाळू कसलकर (वय ३१) , अजित आण्णाप्पा तिप्पे ( २७), सुनील मोहन चौगले ( ३६ , तिघे रा. तमनाकवाडा, चाफा गल्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचे विदेशी मद्य, तीन लाख ५३ हजार ७५० रुपयांची व्हॅन असा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, आंबोली तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरु होती.बुधवारी सायंकाळी सिंधुदूर्ग जिल्हयातील आंबोली (ता. सावंतवाडी) येथून भरधाव वेगाने एक व्हॅन आजऱ्याकडे निघुन गेली. व्हॅनला थांबवण्यास सांगितले असता ती थांबली नाही. संशयावरुन तिचा पाठलाग सुरु केला असता आजऱ्यात व्हॅनला पकडले.
व्हॅनची तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूस भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या प्लॅस्टिकचे क्रेट दिसून आले. ही क्रेट व्हॅनमधून उतरत असताना गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ७५० मिलिचे एकूण ५४ कागदी बॉक्स मिळून आले.
संशयित वाहनचालक शरद कसलकर, अजित तिप्पे व सुनील चौगले हे तिघेजण होते. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. गोवामधून हे विदेशी मद्य आणल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत विदेशी मद्याचे ५४ बॉक्स, प्लॅस्टिकचे क्रेट व व्हॅन असा सुमारे सहा लाख ५० हजार ८७० रुपयांचा माल मुद्देमाल जप्त करण्यात आला.तिप्पे हा यापुर्वी गोवामधून विदेशी मद्य स्वस्तात खरेदी करुन तो कागल व गडहिंग्लज परिसरा वितरित करत होता. त्याला चार महिन्यापुर्वी अशाच प्रकारच्या गुन्हयात अटक केली होती. ही कारवाई विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत निरीक्षक निरीक्षक आर.पी.शेवाळे, दुय्यम निरीक्षक के.बी.नडे, जे.एन.पाटील, जवान एस.डी.जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवि माळगे, वैभव मोरे यांचा सहभाग होता. तपास नडे करीत आहेत.