कोल्हापूर : पेन्शनचे सर्व व्यवहार आॅनलाईन झाल्याने अचूक माहिती भरणे गरजेचे आहे; पण आयुष्यभर शिकविण्याचेच काम केलेल्या शिक्षकांनी अर्ज भरताना घोळ घातला. परिणामी पेन्शन घेणाऱ्या शिक्षकांसह ते देणाऱ्या यंत्रणेलाही फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
बँक खाते चुकीचे पडल्याने रक्कम परत येणे, दुसऱ्यांदा रक्कम जमा होणे, आयएफसी कोडच नसणे अशा समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमुळेच जिल्ह्यातील शिक्षकांना सहा महिने पेन्शनची वाट पाहावी लागली आहे. आता सोपस्कार पूर्ण करून जिल्हा परिषदेने सर्व रक्कम खात्यावर जमा केली असून, अजून ११ जणांची नावे व खाते क्रमांक जुळविण्याचे काम सुरू आहे.जिल्हा परिषदेतील सर्वांत मोठी आस्थापना ही शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीचे वेतन मिळविणाऱ्यांमध्येही शिक्षकांचेच प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात सात हजार ४११ पेन्शनधारक शिक्षक १३ कोटी ५४ लाखांची, तर २ हजार ८५७ शिक्षकेतर कर्मचारी ४ कोटी ३३ लाखांची अशी एकूण १७ कोटी ८७ लाखांची पेन्शन दरमहा घेतात. जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाकडून कार्यवाही पूर्ण करून ट्रेझरीमार्फत बिले काढली जातात.सरकारच्या निर्देशानुसार पेन्शनचे सर्व व्यवहार आॅनलाईन करण्यात आले आहेत. आॅनलाईन डाटा भरताना खाते नंबरमधील एखादा क्रमांक चुकणे, आयएफसी कोड न टाकणे अशा चुका राहिल्या होत्या. परिणामी पेन्शन जमा झाल्यानंतर ती काहींच्या खात्यावर दोन वेळा गेली, तर काहींच्या खात्यावर जमाच झाली नाही, अशा तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागामार्फत तातडीने याबाबत पावले उचलली.
आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत असा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला होता. खात्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यातील चुका दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर सर्व रक्कम जमा झाली आहे. तथापि अजूनही ११ खातेदारांच्या बाबतीत अर्जावरील माहिती व प्रत्यक्षातील माहितीचा मेळ लागत नसल्याने ती रक्कम अदा करण्यात आलेली नाही. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अभिप्राय आल्यानंतरच ती जमा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील पेन्शनर संख्या (कंसात रक्कम)शिक्षक : ७,४११ (१३ कोटी ५४ लाख)शिक्षकेतर : २,८७७ (४ कोटी ३३ लाख)
तक्रार करा, तातडीने दखल घेऊअर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे पेन्शन जमा होण्यात अडचणी आल्या; पण आता प्रश्न मिटला आहे. तरीदेखील कुणाच्या काही तक्रारी असतील तर थेट जिल्हा परिषदेत तक्रार करा, तातडीने दखल घेऊन ती सोडविण्याचा प्रयत्न करू.
राहुल कदम, उपमुख्य वित्त लेखाधिकारी, जि.प कोल्हापूर