कोल्हापूर : ‘युनिक’ मधील कोटीच्या चोरीप्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:46 PM2018-08-06T13:46:33+5:302018-08-06T13:52:22+5:30
कोल्हापूर येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेटबँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आणखी दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूर : येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेटबँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आणखी दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली.
संशयित दिवाकर रमाकांत राय (वय २९, रा. दिवाकर ईस्ट, ठाणे), हबीब अझिझ चौधरी ऊर्फ अक्रम (३३, रा. ट्रायसिटी एन्क्लेव्ह, नवी मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीकडून नाशिक येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चौकशीमध्ये त्यांनी कोल्हापुरातील गुन्ह्याची माहिती दिली.
युनिक आॅटोमोबाईल्स कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बँकिंगद्वारे कंपनीची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली होती. ही रक्कम देशभरातील बारा बँक खात्यांवर वर्ग केली होती. नवी मुंबई, मुंबई, दिल्ली, जमशेदपूर, गुवाहाटी, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणी असलेल्या खातेदारांच्या खात्यांमध्ये पाच ते वीस लाख रुपये वर्ग करण्यात आले होते.
|पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये जाऊन संशयित खात्यांची माहिती घेतली. सायबर क्राइमच्या मदतीने शाहूपुरी पोलिसांनी झारखंडमधून संशयित राजीव रंजन कुमार, विकास साव ऊर्फ विकास कालू (दोघे पटणा, बिहार), मातदिनसिंह सिकरवार ऊर्फ रामबीरसिंह परमार (रा. धौलपूर, राजस्थान) व संशयित महिला कहकसा परवीन (रा. पटना) यांना अटक केली.
याच टोळीने झारखंडमधील बिस्तपूर आणि नाशिकमध्येही अशाच पद्धतीने आॅनलाइन रक्कम लंपास केली आहे. नाशिकच्या सायबर क्राईम विभागाने आणखी दोन गुन्ह्यांची उकल करून संशयित दिवाकर राय व हबीब अक्रम यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोल्हापुरातील गुन्ह्याची माहिती दिली. या दोघांना शाहूपुरी पोलीस ताब्यात घेणार आहेत.