कोल्हापूर : ‘शालिनी’ची इमारत पूर्ववत करून घ्या, हेरिटेज कमिटीची सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:30 PM2018-01-17T17:30:31+5:302018-01-17T17:34:46+5:30
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची साक्ष देणाऱ्या शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी इमारत विना परवाना पाडणे हा गुन्हा असून संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना हेरिटेज कमिटीने महापालिकेला केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची साक्ष देणाऱ्या शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी इमारत विना परवाना पाडणे हा गुन्हा असून संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना हेरिटेज कमिटीने महापालिकेला केली आहे.
आता पुन्हा एकदा आयुक्तांनी वास्तूला हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी इमारत पूर्ववत करून देण्याचा मुद्दा प्रश्नांकित राहणार आहे.
अक्कासाहेब महाराजांनी स्थापन केलेल्या शालिनी सिनेटोनचा परिसर हा देवासच्या महाराजांची खासगी संपत्ती असली त्या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असल्याने तिचा वापर योग्य त्या कारणासाठीच होणे अपेक्षित आहे.
महापालिकेने सन २००३ मध्ये झालेल्या महासभा ठरावात शालिनी सिनेटोनच्या वास्तूचा समावेश हेरिटेज यादीत करण्याचा निर्णय झाला. त्यावर हरकत मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली. त्यावेळी देवासच्या तुकोजीराव पवार महाराजांनी कोणतीही हरकत नोंदवली नाही. त्यानंतर वास्तूचा महापालिकेच्या अंतिम हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला.
तत्पूर्वी देवासच्या महाराजांकडून हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र, २००७ मध्ये ही इमारत विनापरवाना पाडण्यात आली, तेव्हापासून डिसेंबर २०१६ पर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे.
आता तुकोजीराव पवार हयात नाहीत त्यामुळे त्यांनी दिलेले वटमुखत्यार अवैध ठरले आहे. हेरिटेज कमिटीनेही न्यायालयात आपले म्हणणे मांडताना संबंधितांवर गुन्हा दाखल करून इमारत पूर्ववत करून घ्यावी, असे म्हटले होते.
शालिनी सिनेटोनच्याबाबत महापालिकेने चार-पाच दिवसांपूर्वी हेरिटेज कमिटीला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यात समितीने वास्तू पूर्वीपासून हेरिटेजमध्ये आहेच त्यामुळे ती विनापरवाना पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संबंधितांकडून वास्तू पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना मांडली आहे.
शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित वास्तू’ म्हणून जाहीर झाली होती. आता पुन्हा त्यासंबंधीचा अध्यादेश काढला असला तरी संबंधितांनी इमारत पूर्ववत करून द्यावी, असे आमचे म्हणणे आहे. पुढे मग त्या वास्तूचा वापर चित्रपट संग्रहालय किंवा अन्य कारणांसाठी करता येणे शक्य आहे.
- उदय गायकवाड,
सदस्य हेरिटेज कमिटी