कोल्हापूर : पंधरा आॅगस्टच्या निमित्ताने जिलेबी विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नऊ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या.
बुधवारी पंधरा आॅगस्ट असल्याने शहरात अनेक ठिकाणी जिलेबी विक्रीचे स्टॉल लागले होते. या स्टॉलवरून पिशव्यांचा वापर केला जाईल, असा शंका आल्याने महानगरपालिका आरोग्य विभागाने फिरती करून प्रत्येक स्टॉलवर चौकशी व तपासणी केली. त्यावेळी नऊ ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले.नॅशनल बेकरी - भगवा चौक, पुरोहित स्वीट मार्ट, मुक्काराम चौधरी - कसबा बावडा, संदीप बेकर्स -मंगळवार पेठ, मिल्क कॉर्नर- राजारामपुरी, न्यू इंडिया हॉटेल- बाजारगेट, योगेश माळकर - माळकर तिकटी, लक्ष्मीनारायण- माळकर तिकटी, दीपक फरसाण, स्वीट मार्ट- महाद्वार रोड अशा नऊ व्यावसायिकांवर छापे टाकून तेथील प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
तसेच त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही केला. महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर याला पूर्णत: बंदी आहे. तरीही या व्यावसायिकांनी त्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.