कोल्हापूर :भाज्या घसरल्या; साखर उतरली, तूरडाळ वधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:50 PM2018-12-31T13:50:43+5:302018-12-31T13:53:21+5:30
आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.
कोल्हापूर : आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.
सौंदत्ती यात्रा आणि ओढ्यावरची रेणुका यात्रा झाल्याने रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी नव्हती. साधारणत: या आठवड्यात सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. कोबीचा गड्डा साडेपाच रुपये, वांगी २२ रुपये, ढबू मिरची १५ रुपये, घेवडा, कारली २० रुपये, भेंडी २५ रुपये, दोडका ३२ रुपये, फ्लॉवर १० रुपये, कोथिंबीर १० रुपये पेंढी, हरभरा पेंढी १० रुपये, तर टोमॅटो, ओला वाटाणा, मेथीचे दर स्थिर होते.
रविवारच्या आठवडी बाजारात पिवळीधमक व चवीला गोड अशी पपई आली आहे. तिच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.(छाया : नसीर अत्तार)
फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. द्राक्षे ३० रुपये प्रतिकिलो, माल्टा ४५० रुपये चुमडे, तर बोरांचा दर स्थिर म्हणजे १२ रुपये किलो होता. याचबरोबर पपई, केळी, चिंच, क ैरी, किवी, टरबूज, रामफळ व स्ट्रॉबेरी यांचे दर ‘जैसे थे’ होते.
काही दिवसांत भोगी सण असल्यामुळे राळ्याच्या तांदळाला बाजारात मागणी वाढू लागली आहे. तो प्रतिकिलो १०० रुपयांच्या घरात गेला आहे. बन्सी गहू २८, आॅलिम्पिक ३४ रुपये, तांदूळ रत्नागिरी ४४ व ५० रुपये, बाजरी एक नंबर २८ रुपये झाली आहे. मात्र गेल्या १० ते १५ दिवसांत तूरडाळीच्या दरात वाढ होत आहे. पूर्वी ती ६८ रुपये होती. ती आता ७६ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ड्रायफु्रटचे दर जैसे थे आहेत.
गूळ स्थिर; कांदा, बटाटा उतरला
गेल्या आठवड्यात गुळाच्या रव्याचा बॉक्स ३५ रुपये होता, तोच दर या आठवड्यात होता. तो स्थिर होता; पण कांदा व बटाट्याच्या दरात घसरण झाली आहे. कांदा पाच रुपये, तर बटाटा १० रुपये किलो होता. कांद्यात दोन रुपयांची व बटाट्यामध्ये सात रुपयांची घसरण झाली आहे.