आगळं-वेगळं कोल्हापूर..चक्क स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:31+5:302021-05-25T04:26:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील दुधाळी मॉर्निंग स्पोटर्सच्या पंचवीस सदस्यांनी रविवारी दिवसभर चक्क पंचगंगा स्मशानभूमीत श्रमदान करून आगळ्या-वेगळ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील दुधाळी मॉर्निंग स्पोटर्सच्या पंचवीस सदस्यांनी रविवारी दिवसभर चक्क पंचगंगा स्मशानभूमीत श्रमदान करून आगळ्या-वेगळ्या समाजकार्याची प्रचिती आणून दिली. कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठीही स्मशानभूमीत जाताना लोकांच्या अंगावर काटा उभा राहत असताना या बहाद्दर कार्यकर्त्यांनी दिवसभर तेथे सरण रचण्यापासून सर्वप्रकारचे काम केले आणि तेथील नियमित कर्मचाऱ्यांना एक दिवस विश्रांती दिली. कोल्हापूरकर कशासाठी मदतीला धावून जाईल, याचा नेम नाही याचेच प्रत्यंतर त्यातून आले. हे खरंच आगळं-वेगळं कोल्हापूर आहे.
कोविडसारख्या महामारीने उचल खाल्ली असून रोज चाळीस ते पन्नास रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेले वर्षभर कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील, राज्यातील व्यक्तींवर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे स्वाभाविकच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर प्रतिदिन कामाचा ताण वाढला आहे तरीही नेटाने कर्मचारी काम करत आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवस सुटी देऊन आपण त्यांचे काम करूया, अशी एक कल्पना दुधाळी मॉर्निंग स्पोटर्सच्या सदस्यांनी सुचली. रोज क्रिकेट खेळणाऱ्या या सदस्यांनी स्मशानभूमीतील श्रमदानासाठी रविवारचा दिवस निश्चित केला. सर्व सदस्य सकाळी दहा वाजता स्मशानभूमीत पोहोचले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंडपणे त्या सर्वांनी स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ केला. कोविड मृतांची रक्षा विसर्जित केली. बेडवर सरण रचले. दान म्हणून आलेले दोन ट्रक शेणी व लाकूड उतररून घेऊन ते गोडाऊनमध्ये रचून ठेवले. स्मशानभूमीतील जी कामे कर्मचारी करत होते, ती सर्व कामे कार्यकर्त्यांनी केली. ड्युटीवर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी सुटी दिली.
धान्याचे किटही...
एवढेच नाही तर स्मशानभूमीतील सर्व कर्मचाऱ्यांना एक महिना पुरेल इतके धान्याचे कीट देऊन त्यांच्या सेवेचे यथोचित कौतुक केले. या आगळ्या-वेगळ्या श्रमदानाची परिसरात चर्चा झाली. समाज सेवा करण्यास केवळ पैसेच लागतात असे नाही तर ते वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते हेच या सदस्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.
फोटो : २४०५२०२१-कोल-पंचगंगा स्मशानभूमी
कोल्हापुरातील दुधाळी मॉर्निंग स्पोर्टसने रविवारी दिवसभर चक्क पंचगंगा स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. कोल्हापूरकर कशासाठी मदतीला धावून जाईल याचा नेम नाही याचेच प्रत्यंतर त्यातून आले. (नसीर अत्तार)