कोल्हापूर : देवदासी महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान मंजूर करावे, दर महा १५०० रुपये अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत देवदासी महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढला. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, कोण म्हणतय देत नाही, अशा घोषणा देत महिलांनी लाटण्यांनी थाळी नाद करत तीव्र निदर्शने केली.दुपारी बाराच्या सुमारास महाविर उद्यान येथून नेहरु युवा देवदासी विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक भंडारे व मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. कपाळी भंडारा लावलेल्या व हातात लाटण व थाळी घेतलेल्या देवदासी महिला घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्या. या ठिकाणी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली व लाटण्याने थाळी नाद करुन तीव्र निदर्शने केली. यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, देवदासी महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान मंजूर करावे, सध्या मिळणाऱ्या ६०० रुपये अनुदानात वाढ करुन दर महा १५०० रुपये अनुदान मिळावे, देवदासींनी घरकुलासाठी सादर केलेल्या प्रस्तावास मंजूरी द्यावी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रमुख मागण्या मंजूर करण्याचा घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक प्रस्ताव तयार करावा, हा प्रस्ताव तात्काळ शासनाच्या महिला व बालविकास उपायुक्तांना सादर करावा.या मागण्या लवकर मान्य झाल्या नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला. आंदोलनात मुनाफ बेपारी, देवाताई साळोखे, शांताबाई पाटील, मालन कांबळे, यलवा कांबळे, नसीम देवडी, पंकज भंडारे, रमेश साठे, योगेश गवळी, बाबासो पुजारी, आक्काताई आवळे, शालन सकटे, रत्नाबाई काळे, शांताबाई मधाळे, रेखा वडर आदींसह देवदासी महिला सहभागी झाल्या होत्या.