कोल्हापूर : विद्यापीठ कायदा हा विद्यार्थी केंद्रीत आहे. त्यासह संशोधनास चालना, उद्योगांसमवेत सहकार्यवृद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान अधोरेखित करणारा आहे. या चतु:सुत्रीच्या आधारे क्षमता संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वच अधिकार मंडळांनी कार्य करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी कायदा आणि उपरोक्त चार स्तंभांच्या आधारे व्यवस्था समजून घेण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.विद्यापीठातर्फे आयोजित ‘अधिकार मंडळांची कार्यपद्धती’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वि. स. खांडेकर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा-२०१६ नुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या अधिसभा, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद यांसह विविध अधिकार मंडळांच्या सदस्यांना अधिनियम, परिनियम, विविध अधिकार, नियम, संकेत आदींची माहिती देण्यासाठी विद्यापीठातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठ कायदा समजून घेण्याची प्रक्रिया निरंतर आहे. त्याचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा स्वत:बरोबरच इतरांना आणि व्यवस्थेला सकारात्मक लाभ करून देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
विद्यापीठामधील सर्व अधिकार मंडळे, सभागृहे ही शैक्षणिक स्वरूपाची आहेत. हा महत्त्वाचा संकेत ध्यानी ठेवून या सभागृहांमध्ये ज्ञानाधिष्ठित चर्चा व्हावी. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.